करमाळा : उजनी जलाशयात अवैध वाळू उपसा करणाºया ३८ बोटी जिलेटिनचा स्फोट घडवून नष्ट करण्यात आल्या. पथक स्पीड बोटने घटनास्थळापर्यंत पोहोचले. आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. ही कारवाई इंदापूर, करमाळा, दौंडच्या महसूल विभागाने केली. या कारवाईत वाळूमाफियांचा दोन ते अडीच कोटींचा मुद्देमाल पाण्यात बुडाला आहे. पथक येताच वाळूमाफिया पसार झाले.
उजनी जलाशयात वाळूमाफियांवर कारवाईचे सत्र सुरू असले तरी रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने वाळू उपसण्याचा दणका वाळूमाफियांनी लावला होता. त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत होता आणि वाळूमाफिया हद्दीचा फायदा घेत असल्याने यांच्यावर कठोर कारवाई होत नव्हती. गुरूवारी इंदापूर, दौंड आणि करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने उजनी जलाशयात करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोली, दौंड तालुक्यात खानोटा व इंदापूर तालुक्यातील डिकसळ नदी पात्रात स्पीड बोटमधून जाऊन कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३८ बोटी जिलेटिनच्या साह्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या. उजनी जलाशयात वाळूमाफियांवर कारवाई होत असताना वाळूमाफिया नेहमी त्या गावाची हद्द ओलांडून दुसºया तालुक्याच्या हद्दीत जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात अडचण येत होती. त्यामुळे संयुक्त कारवाई करून बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.
संयुक्त पथक- संयुक्त पथकात करमाळ्याचे तहसीलदार सुशील बेल्हेकर, दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, इंदापूरच्या तहसीलदार मोटे सहभागी झाले होते. पथकाने करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोलीसह दौंड तालुका हद्दीतील खानोटा, इंदापूर तालुक्यातील डिकसळ भागात स्पीड बोटीत फिरून बेकायदा वाळूच्या बोटी लक्ष्य करीत जिलेटिनने उद्ध्वस्त केल्या. मोठी कारवाई केल्यामुळे वाळूमाफिया पसार झाले.