आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी नव्याने टाकण्यात येत असलेल्या सोलापूर-उजनी दुहेरी जलवाहिनीच्या कामासाठी महापालिकेला ३९४ काेटी रुपयांची कमतरता भासत आहे. त्यामुळे हा निधी त्वरित मिळावा, यासाठी महापालिका प्रशासनाकडून शासन दरबारी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली. असे असले तरीही या जलवाहिनीच्या बंद कामाबाबत नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सोलापूर-उजनी ही १७० एमएलडी क्षमतेची दुहेरी जलवाहिनी आहे. या कामाचा मक्ता नुकताच लक्ष्मी कंपनीला देण्यात आला आहे. दुहेरी जलवाहिनीसाठी स्मार्ट सिटी योजनेतून अडीचशे कोटी आणि एनटीपीसीकडून अडीचशे कोटी रुपये मिळणार आहेत. तरीही महापालिकेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ३९४ कोटी रुपयांची गरज आहे. त्यासाठी महापालिका शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. दरम्यान, अंतर्गत पाइपलाइन व ड्रेनेजच्या कामासाठी महापालिकेला साडेपाचशे कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. सध्या या जलवाहिनीचे काम बंद असल्याने नागपूर अधिवेशनात मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आ. प्रणिती शिंदे यांनी स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.
काम थांबविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
सोलापूर-उजनी जलवाहिनीचे काम थांबविणाऱ्या संबंधित स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आ. प्रणिती शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात केली. याचबरोबरच यापुढे एक दिवसही विलंब न लावता या जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याच्या सक्त सूचना शासनाने संबंधित यंत्रणांना द्याव्या, अशीही मागणी आ. शिंदे यांनी अधिवेशनात केली आहे.
२०२४ पर्यंत काम होईल का?
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे चेअरमन असिम गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी स्मार्ट सिटी संचालकांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना असे सांगितले की, उजनी-सोलापूर जलवाहिनीचे काम २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले. मात्र, २०२४ पर्यंत तरी हे काम नक्की पूर्ण होईल, अशी शंका माजी नगरसेवकांनी ‘लोकमत’समोर बोलताना व्यक्त केली आहे.