बार्शी : एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या बंद घराच्या मागील गेटचे कुलूप तोडून चार चोरटे घरात शिरले. झोपेत लाकडी दांडक्यांनी मारहाण करून चाकूचा धाक दाखवत कपाटातून ३५ हजारांच्या रोकडसह ९ तोळ्याचे दागिने असा ४ लाख ३३ हजारांचा ऐवज पळविला.
सोमवारी पहाटे सुभाष नगरमध्ये घडलेल्या घटनेने बार्शीत एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सेवानिवृत्त मुख्याध्यापक गजेंद्र गेना जाधव (रा. वाणी प्लॉट, बार्शी) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
गजेंद्र जाधव आणि त्यांची मुले, सून हे एकत्रित राहतात. रविवारी रात्री सर्वजण जेवण आटोपून घरात झोपी गेले. जाधव दांपत्य हे हॉलमध्ये झोपी गेले होते. रात्री झोपमोड झाल्याने गजेंद्र जागे झाले. इतक्यात त्यांना झिरो बल्बच्या उजेडात दोन चाेरटे समोर उभारलेले दिसले. त्यांच्या हातात लाकडी दांडके होते. आणखी एकाच्या हातात बॅटरी होती. तर कपाटाजवळ उभारलेले इतर दोन दिसले. समोर आलेल्या दोघांनी चाकू दाखवून गप्प बस, नाहीतर बायकोलाही जीवे मारू...असे धमकावत गजेंद्र यांच्या मांडीवर मारले. काय घडतेय हे त्यांना समजले नाही आणि ते दिवानवर जाऊन झोपले. त्यानंतर कपाटाजवळील थांबलेल्या चोरट्यांनी आतील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले. रोख रक्कम व दागिने काढून घेतले. जाताना मुलाच्या रुमालाने बाहेरून कडी लावून गेले.
---
गंठन, कर्णफुले, अंगठ्यांवर मारला डल्ला
चोरट्यांनी कपाटात ठेवलेले रोख ३५ हजार रुपये काढून घेतले. याशिवाय १ लाख ९५ हजारांचे ४३ ग्रॅम सोन्याचे गंठन, ९० हजारांचे २० ग्रॅम सोन्याचे गंठन, ३२ हजारांची ७ ग्रॅम कर्णफुले, ४५ हजारांच्या दोन अंगठ्या, ३४ हजारांची अंगठी, मणी मंगळसूत्र असा ऐवज चोरट्यांनी पळविला.
----
अपर पोलीस अधीक्षक घटनास्थळी
दरोड्याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, विभागीय पोलीस अधीक्षक अभिजित धारशिवकर, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार घटनास्थळी दाखल झाले. यानंतर श्वान आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक उदार करत आहेत.
----
फोटो : १४ बार्शी क्राईम
बार्शीत गजेंद्र जाधव यांचे घरात कपाट उचकटून चोरट्यांनी रोखड आणि दागिने पळविले