पंढरपूर : ४० लाख रुपयांची सुपारी घेऊन एकाला जीवे मारण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना देशी बंदूक, कोयता कुराड याच्यासह ताब्यात घेतले असल्याचे माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
माझ्या जिवाला धोका आहे. मला आपण वाचवू शकता. अशी मदत नागनाथ शिवाजी घोडके यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या कडे मागितली. त्यावर कदम यांनी गुन्हे अन्वेषण शाखा प्रमुख राजेंद्र गाडेकर यांना तत्काळ यावर कारवाई करण्यासंदर्भात सूचना केल्या. गाडेकर यांनी तत्काळ सूत्रे फिरवत अधिक माहिती घेतली.
एका कारमध्ये हनुमंत जाधव, बंडू घोडके, बंडू मासाळ व बापू गोडसे असल्याची माहिती मिळाली. त्यांना थांबून तपासणी केली असता त्यांच्याकडे बंदूक कुऱ्हाड कोयता यासारखी शस्त्र आढळून आले. नागनाथ शिवाजी घोडके यांना मारण्यासाठी संतोष कोकरे यांनी ४० लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. त्या चौघांना न्यायालयात हजर केले असता २ दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
दरम्यान, पोलीस कर्मचारी सूरज हेंबाडे, शोयब पाठण, समधान माने, गणेश पवार, इरफान शेख, सिध्दनाथ माने, सुजित जाधव यांनी ही कारवाई केली आहे.