सोलापूर: रात्र झाली की सोलापूरचं फूटपाथ अनाथ, वंचित, बेसहारा लोकांचं घर. हाच त्यांचा आसरा आणि घरही. अशा शहरातील लोकांना शोधून माणुसकी दाखवत शनिवारी पहाटेपर्यंत चादरी, रग पांघरुन मायेची ऊब देण्यात आली. शहरातील अडीचशे लोकांना माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला.
दिवाळी झाली की चाहूल लागते ती थंडीची. कुणाला चांगली वाटते तर कुणाला त्रासदायक. अशा थंडीच्या कडाक्यात रस्त्यावर झोपणाºया लोकांचं काय होत असेल. अशा गरजू, अनाथ, वंचितांचा विचार करुन सोलापुरातील विविध क्षेत्रात कार्य करणाºया तरुणांनी मिळून सुरू केलेल्या माणुसकी फाउंडेशनच्या वतीने ‘द्या स्वेटर गरजूंना’ या उपक्रमांतर्गत लोकांना गरम व उबदार कपडे देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल २५० हून अधिक व्यक्तींना पुरतील एवढ्या चादरी, रजई, स्वेटर,मफलर, जरकीन या वस्तू प्राप्त झाल्या.
या वस्तू शनिवारी रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत रस्त्यावर झोपणाºया गरजूंना वाटण्यात आल्या. मध्यरात्री शिवाजी महाराज चौकापासून या उपक्रमाचा शुभारंभ झाला. पुढे शनि मंदिर, रेल्वे स्थानक,सात रस्ता, विजापूर रोड, सैफुल, जुळे सोलापूर,आसरा चौक, नई जिंदगी, गांधीनगर, काळजापूर मारुती, सिव्हिल हॉस्पिटल, सिद्धेश्वर मंदिर व एसटी स्टँड आदी परिसरात रस्त्यावर झोपलेल्याना पांघरून घालण्यात आले. यावेळी काही गाढ झोपेत, तर काही जागे झाले. माणुसकीच्या या मायेमुळे ते गहिवरले. तुम्हीच आमचे देव अशा भावनाही व्यक्त केल्या. प्रा. हिंदुराव गोरे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अनिकेत चनशेट्टी, मल्लिनाथ शेट्टी, महेश भासगी, प्रा.आकाश वोरा, स्वामीराज बाबर, डोंगरेश चाबुकस्वार, स्वप्निल गुलेद, प्रेम भोगडे, आदित्य बालगावकर, विनीत अवधूत, निखिल अंकुशे, योगेश कबाडे, शुभम हंचनाळे, विवेक नवले, रामेश्वर समाणे, मोहसीन शेख, अनिकेत व्हरटे, कृष्णा माने, अक्षय आकाडे, कृष्णा थोरात, विलास शेलार, सूरज रघोजी, सायना कोळी, हनुमंत कोळी, अभिराज धुम्मा, रोहन कांबळे, समर्थ उबाळे, आकाश मुस्तारे, रवी चन्ना, प्रतीक भडकुंबे, ऐश्वर्या जाजू, प्रशांत पोतु, निरंजन राऊळ, प्रशांत परदेशी, प्रवीण माने, अमोल गुंड यांनी परिश्रम घेतले.