सोलापूर : जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील मतदान प्रक्रिया करून घेण्यासाठी १८ हजार ३१० कर्मचारी नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकाºयांबरोबर गुरूवारी रात्री तयारीबाबत बैठक झाली. या बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मतदान केंद्राध्यक्षासह पर्यवेक्षक, सहायकांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. मतपत्रिकेचा हिशोब देण्याबाबत काटेकोरपणा ठेवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ३५२१ मतदान केंद्रे फायनल करण्यात आली आहेत.
९९ टक्के मतदारांकडे ओळखपत्र आहे. फेब्रुवारीत २ लाख ५७ हजार ४८५ ओळखपत्रे आली होती. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी नव्याने ३ हजार १७९ इतकी ओळखपत्रे आली. ओळखपत्र वाटपाचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात दिव्यांग मतदार १८ हजार १३९ इतके आहेत. त्यात चालता न येणारे १९११ मतदान केंद्रांवरील ७ हजार ३८५ मतदार आहेत. या मतदारांसाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर व गरज भासल्यास त्यांना घरून आणण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
मतदान केंद्रांवर काम करणाºया कर्मचारी व अधिकाºयांसाठी १९ हजार २५२ व पोलिसांसाठी ४ हजार ८१ इतकी पोस्टल बॅलेट छापण्यात आली आहेत. ईव्हीएमवरील मतपत्रिका छपाईचे काम पूर्ण झाले आहे तर आता मतदार स्लिपा छपाई पूर्ण झाली असून, मतदारसंघनिहाय या स्लिपा वाटपाचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. मोहोळ मतदारसंघात शुक्रवारपासून स्लिपा वाटपाचे काम सुरू झाले आहे. ग्रामीण हद्दीत ३४ इमारतींत २० आणि शहर हद्दीत ३९ इमारतींत ५३ मतदान केंद्रे क्रिटिकल आहेत. ग्रामीण हद्दीत तीन मतदान केंद्रांची क्रिटिकल म्हणून वाढ झाली आहे.