मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील ४ हजार १०१ शेतकरी पात्र झाले आहेत. आतापर्यंत ३६ कोटी ४५ लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या तालुक्यातील ८१ गावातील ४ हजार १०१कर्जमुक्त झाले आहेत अशी माहिती सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली होती. मंगळवेढा तालुक्यातील ४ हजार ५५९ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्यातील ४ हजार १०१ शेतकरी पात्र झाले होते. तसेच ४ हजार १२४ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले. यांतील सर्वाधिक शेतकरी हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आहेत यासह राष्ट्रीयकृत बँकेचे आहेत .मध्यंतरी कोरोनामुळे कर्जमाफी थांबली होती; मात्र खरीप हंगामात शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, म्हणून महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीच्या कामास पुन्हा गती दिली होती. त्यानुसार २१ नोव्हेंबर २०२० पर्यत शेतकऱ्यांचे ३६ कोटी ४५ लाख रुपये आले आहेत. ४ हजार १०१ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर आली असून, २६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले आहे तर तक्रार असलेली ९६ शेतकऱ्यांची खाती आहेत अशी माहिती सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सचिन जाधव यांनी दिली.
प्रारंभी काहीशी अडचणीची दिसत असलेली राज्य सरकारची कर्जमाफी कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरली आहे. सरकारकडून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. त्या काळापासून आतापर्यंत व शेतकऱ्यांच्या पाच याद्या प्राप्त झाल्या आहेत. यात ४ हजार १०१ शेतकरी पात्र ठरले.
शेतकऱ्यांचे खाते कर्जमुक्त होताच त्यांना नव्या कार्जाचा लाभ झाला. मध्यंतरी सातबारावर कर्जाचा उल्लेख असल्याने काही शेतकऱ्यांना कर्जासाठी त्रास सहन करावा लागल्याचा प्रकार घडला. यावर शासनाने हमी दिल्यावरही काही बँका शेतकऱ्यांना कर्जासाठी फिरवत असल्याचे पुढे आले होते. या सर्व स्थितीवर मात करत तालुक्यात कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्याप कर्ज मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना कर्ज मिळावे याकरिता शासन स्तरावरून प्रयत्न केले जात आहे.
राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीचा अनेक शेतकऱ्यांना लाभ होताना दिसतोय. मागील अनेक वर्षांपासून नवीन पीक कर्जापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आता पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग या योजनेमुळे सुकर झाला आहे. पण असे असलं तरी इतरही शेतकऱ्यांना योजनेचा तातडीनं लाभ देण्याची गरज आहे. कारण एकीकडे कोरोनाशी लढताना शेतमालाचे भाव पडल्याने झालेलं आर्थिक नुकसान अजूनही भरून निघालेलं नाही.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेच्या जाहीर झालेल्या पाच याद्यांमध्ये जे शेतकरी मृत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या वारसांना या माफीचा लाभ मिळणार आहे. यात केवळ त्यांना बँकेच्या खात्यात बदल करायचे आहे. त्यामुळे काही लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास विलंब होत आहे.
महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला . मात्र फडणवीस सरकारच्या काळातील कर्जमाफी योजना फसवी ठरली अद्याप शेकडो शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही त्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत मात्र महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या योजनेमुळे चार हजार शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत- बसवराज पाटील, माजी संचालक, दामाजी साखर कारखाना मंगळवेढा