पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आप्पासोा पवार, पोलीस नाईक तुकाराम व्हरे, पोलीस अमर पाटील हे गुरुवारी रात्री सांगोला वंदे मातरम चौक ते एखतपूर रोडवर पेट्रोलिंग करीत होते. यावेळी बातमीदारामार्फत हातभट्टीची दारू घेऊन चारचाकी वाहन सांगोल्याच्या दिशेने येत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयासमोर थांबून सापळा लावला.
यावेळी एखतपूरकडून एमएच १३/सीडी ९३१४ ही कार येताना दिसली. पोलिसांनी झडती घेतली असता, पांढऱ्या पोत्यात काळ्या रंगाच्या २ ट्यूबमध्ये ४०० लिटर हातभट्टी दारू मिळून आली. पोलिसांनी ४ हजारांच्या हातभट्टी दारूसह ८० हजार रुपये किमतीची कार असा ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमर पाटील यांनी हनुमंत पोपट बुधावले (रा. लिंगीविरे, ता. आटपाडी) याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.