सोलापूर : सातबारावर काही हाती लागले नाही, मात्र जन्म-मृत्यूच्या नोंदीत राळेरास येथे १५ व होनसळ येथे एक अशा ‘कुणबी’ मराठा एकूण १६ नोंदी आढळल्याचे तहसीलदार सैफन नदाफ यांनी सांगितले. एकूण ३९ हजार ९५२ नोंदी तपासल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मागणीचा विषय ऐरणीवर असल्याने कुणबीच्या नोंदी तपासण्याचे शासनाचे आदेश आहेत. शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पथकामार्फत ९ नोव्हेंबरपासून जुन्या दप्तराची तपासणी सुरू आहे. शनिवारपर्यंत ३९,९५२ नोंदींची तपासणी करण्यात आली. जुन्या सातबारावर कुणबीच्या नोंदी आढळल्या नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, १९१८ व १९३२ मध्ये जन्म-मृत्यूच्या नोंदीत होनसळ येथे एक व राळेरास येथे १५ नोंदी कुणबी म्हणून आढळल्या असल्याचे तहसीलदार नदाफ म्हणाले. यातील मराठीत १५ तर एक नोंद मोडी लिपीत आढळली आहे. आणखीन तपासणी राहिली असून, पुढील एक-दोन दिवसांत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.
या गावांच्या नोंदीत कुणबी आढळले नाही
उत्तर सोलापूर तालुक्यात नान्नज, कारंबा, बीबीदारफळ, भागाईवाडी, कळमण, पडसाळी, इंचगाव, वांगी, रानमसले, कौठाळी, मोहितेवाडी, शिवणी, साखरेवाडी ही गावे हैदराबाद संस्थांमधून सोलापूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. या गावांच्या नोंदीत कुणबी आढळले नाही. मात्र होनसळ, राळेरास येथे कुणबी नोंदी आढळून आल्या. उर्वरित तपासणीत काही नोंदी सापडतात का?, याकडे लक्ष लागले आहे.