सोलापूर: जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला प्रतिसाद वाढला असून, आत्तापर्यंत एक लाख नागरिकांनी लस घेतली आहे. यात ४० हजार ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी शितलकुमार जाधव यांनी लोकमत शी बोलताना दिली.
मार्च महिन्यात कोेरोना लसीकरणाला प्रतिसाद दुपटीने वाढला आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली. पहिला टप्पा आरोग्य व त्यानंतर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला. १ मार्च पासून जोखमीचे १९ आजार असलेले ४५ वर्षावरील रुग्ण व ६० वर्षापुढील ज्येष्ठांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याबरोबरच खाजगी रुग्णालयात केवळ अडीचशे रुपये शुल्क आकारून लस घेण्याची व्यवस्था करण्यात आली.
पहिले दोन दिवस सर्व्हर डाऊन असल्याने नाव नोंदणीला अडचण आली. त्यानंतर मात्र लसीकरणाने वेग घेतला. २३ मार्चअखेर शहर व जिल्ह्यातील ४० हजार २९ ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच जोखमीचे आजार असलेल्या १३ हजार ६३ जणांनी लस घेतली आहे. चार दिवसापूर्वी २५ हजार डोस आले व मंगळवारी रात्री ३४ हजार डोसचा पुरवठा होणार असल्याचे लसीकरण विभागप्रमुख डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांनी सांगितले.
याचबरोबर ३२ हजार ५६९ आरोग्य व १५ हजार ३८१ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. अशाप्रकारे एकूण १ लाख १ हजार ४२ जणांनी लस घेतली आहे. तसेच १७ हजार ५५१ आरोग्य व ५ हजार १२२ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. शहर व जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक व जोखमीचे आजार असलेल्या नागरिकांची संख्या ६ लाखावर आहे. जाेखमीचे आजार असलेल्या रुग्णांना लस घेण्यात अडचणी येत आहेत. ज्यांना गंभीर आजार आहेत व औषधे सुरू आहेत, अशा रुग्णांना उपचार सुरू असलेल्या डॉक्टरांचा लसीसाठी सल्ला घेण्यात यावा असे सुचविले जात आहे.
आता संख्या वाढणार
केंद्र शासनाने ४५ वर्षावरील सर्व व्यक्तींना लस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार शहर व जिल्ह्यातील नागरिकांची माहिती घेण्यात येत आहे. या निर्णयामुळे एप्रील महिन्यात लसीकरणाचा वेग आणखी वाढेल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले.
प्राथमिक शिक्षकांना लस
जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या व आरोग्य सर्वेक्षणात असणाऱ्या सर्व शिक्षकांना मोफत लस देण्यात येणार आहे. यामुळे लसीकरण केंद्र वाढविण्यात येणार आहेत. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात असणाऱ्या सोयी विचारात घेतल्या जात आहेत. एखाद्याला असलेले आजार व प्रतिकार शक्तीवरून काही गुंतागुंत निर्माण झाली तर यंत्रणा कशाप्रक़ारे तयार ठेवायची हे तपासले जात आहे.