करमाळा : तालुक्याच्या पूर्वभागास वरदायिनी ठरलेल्या दहीगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी हंगामाचे थकीत वीजबिल ४१ लाख ३० हजार महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे महामंडळाने भरले. त्यामुळे दहीगाव उपसा सिंचन योजनेचा वीजपुरवठा खंडित होण्यापासून टळले. आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नाचे सर्वसामान्यांनी आभार व्यक्त केले.
संजयमामा शिंदे हे करमाळा मतदारसंघाचे आमदार झाल्यापासून दहीगाव उपसा सिंचन योजनेचे हे चौथे आवर्तन आहे. ते आमदार होण्यापूर्वी थकीत असलेले ७४ लाख वीजबिल व त्यानंतर इतर तीन वीजबिले असे एकूण दाेन कोटी २० लाख रुपये वीजबिल आमदार संजयमामा शिंदे यांनी कृष्णा खोरे महामंडळाकडे पाठपुरावा करून आत्तापर्यंत भरले आहे.
---
शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण
सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीजबिल वसुलीविषयी तगादा सुरू आहे. याचाच परिणाम म्हणून दहीगाव उपसा सिंचन योजनेचा वीजपुरवठा खंडित केला जाईल, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात होती. परंतु तत्पूर्वीच चालू हंगामाचे असलेले १५ मार्च २०२१पर्यंतचे एकूण वीजबिल ४१ लाख ३० हजार रुपये नुकतेच कृष्णा खोरे महामंडळाने भरल्यामुळे शेतकरीवर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे.