मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
अतिवृष्टीच्या नुकसानीचा निधी आल्यानंतर तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावा यासाठी तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिवाळी सुट्टी रद्द केल्या .सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या गावनिहाय याद्या बँकेकडे देण्यात आल्या मात्र निधी असूनसुद्धा सलग तीन दिवस बँकांना सुट्ट्या आल्या असल्याने ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहिला आहे शेतकऱ्यांना उधार उसनवारी करून दिवाळी सण करण्याची पाळी आली आहे.
मंगळवेढा तालुक्यात भिमा नदीला आलेला महापूर व झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी २० कोटी ९६ लाख ६४ हजार इतके अनुदान प्राप्त झाले . हे अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया वेगाने केली या दरम्यान तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलचे कर्मचारी यांनी खूप मोठे परिश्रम घेतले मात्र सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने हा निधी असुनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.
ऑक्टोबर महिन्यात दि. १३ ते २० या दरम्यान भिमा नदीला महापूर आला होता. या महापूरात बठाण,उचेठाण, ब्रम्हपुरी,माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, अरळी, सिध्दापूर, तांडोर या नदीकाठावरील तसेच माण नदीकाठावरील गावाच्या शेती पिकात मोठया प्रमाणात पाणी घुसल्याने पिके आडवी पडून प्रचंड नुकसान झाले होते. काळया शिवारात रब्बी ज्वारी,सुर्यफूल,तुरी,कांदा अतीवृष्टी झाल्याने ८१ गावातील पिकांचे नुकसान झाल्याने शासनाच्या आदेशाप्रमाणे तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाने पाहणी करून नुकसानीचा अहवाल महसूल प्रशासनास सादर केला होता.यामध्ये नुकसानीपोटी मंगळवेढा महसूल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे३४ कोटी ७६ लाख ७९ हजार ८२२ ची गरज असल्याचे कळविले होते. मात्र प्रत्यक्षात २० कोटी ९६ लाख ६४ हजार इतके अनुदान प्राप्त झाले होते .या आकडेवारीनूसार प्रति हेक्टर जिरायत बागायत दहा हजार रुपये तर फळबागांसाठी प्रती हेक्टर २५ हजार रुपये नुकसान भरपाई शेतकर्यांना मिळणार आहेत.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आलेला निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी बँकेकडे पाठवण्यात आला आहे मात्र सलग तीन दिवस सुट्टी असल्याने हा निधी सोमवार नंतर शेतकऱ्यांना मिळेल- स्वप्निल रावडे , तहसीलदार मंगळवेढा
मंगळवेढा तालुका महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांना दिवाळीत मदत निधी मिळावा म्हणून दिवाळीच्या सुट्ट्या कॅन्सल करून तातडीने याद्या बँकेकडे पाठवल्या मात्र बँकेने सामाजिक भावनेतून एक दिवस सुट्टी रद्द करून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला असता शेतकऱ्यांचे बँक खाते कोरे राहिले नसते शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली असती- माणिकबाबा पाटील, शेतकरी ब्रह्मपुरी