अक्कलकोट : तालुक्यात एकूण ७२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. गुरुवारी छाननी प्रक्रिया पार पडली. विविध कारणांनी ४२ उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केले.
दि. ३० डिसेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. ७२ ग्रामपंचायतींसाठी २३५ प्रभागांतून ६३४ सदस्य जागा निवडूण द्यावयाचे आहे. त्यासाठी अर्ज दाखल करायचे अखेरच्या दिवसापर्यंत १ हजार ८७९ उमेदवारांनी १ हजार ८८३ अर्ज दाखल केले. या सर्व अर्जांची गुरुवारी छाननी झाली. त्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र, जातपडताळणी पोच, चुकीच्या जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करणे, इतर कागदोपत्राची पूर्तता नसणे आदी कारणास्तव ४२ उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अवैध ठरविले.
गुरुवारी सकाळपासूनच तहसील कार्यालय येथे ग्रामीण भागातून इच्छुक ठाण मांडून राहिले. हे उमेदवार अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदोपत्राची सत्यप्रति घेऊन हजर होते. सलग दुसऱ्या दिवसी तहसीलदार कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते. एकमेकांनी एकमेकांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याने काही ठिकाणी वाद झाला. यावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.