सोलापूर : राज्यात २०७ साखर कारखान्यांचे साडेसात कोटी मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून, त्यामध्ये ४२ साखर कारखान्यांचे ५ लाखांपेक्षा अधिक व एकूण तीन कोटी मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप झाले आहे. राज्यातील चार कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. दरम्यान, अवेळी पावसाने उसाच्या वजनात वाढ झाल्याने १० टक्के गाळप वाढेल असा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे.
राज्यात यंदाच्या गाळप हंगामासाठी १४ लाख हेक्टर उसाची नोंद झाली आहे. कमी पाऊस पडल्याचा परिणाम ऊसवाढीवर झाल्याने गाळपही कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता; मात्र ऑक्टोबर महिन्यात राज्यात अवेळी पाऊस पडला. चांगला पाऊस पडल्याने उसाच्या वाढीसाठी फायदा झाल्याचे कारखान्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे अंदाजापेक्षा १० टक्क्यांपर्यंत गाळप वाढेल असे सांगण्यात आले.
राज्यात सध्या २०७ साखर कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम घेतला असून, गुरुवारपर्यंत ७४८ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. राज्यात २०७ साखर कारखाने गाळप घेतले असले तरी अधिक क्षमतेच्या ४२ कारखान्यांनी तीन कोटींपेक्षा अधिक गाळप केले आहे. उर्वरित १६५ साखर कारखान्यांचे चार कोट मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप झाले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाच्या तक्त्यावरून दिसत आहे.