संताजी शिंदे
सोलापूर : जिल्ह्यातील आकरा तालुक्यात गेल्या २०१९ मध्ये २० तर २०२० या वर्षात २२ असा एकूण ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र सर्पदंश झालेल्यांमध्ये बरे होण्याचे प्रमाण सोलापुरात जास्त असून राज्यात प्रथम क्रमांक लागतो.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतामध्ये काम करीत असताना सर्पदंशाचे अनेक प्रकार घडतात. यामध्ये तरुणांचे प्रमाण जास्त आहे. सर्पदंश झाल्यानंतर तत्काळ त्यांना सरकारी दवाखाना किंवा सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले की उपचार केले जातात. त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी आहे. खूपच गंभीर असेल आणि दवाखान्यात आणण्यास वेळ झाला असेल तर रुग्ण दगावतो. शासकीय रुग्णालयात डॉ. विठ्ठल धडके, डॉ. शुभांगी धडके, डॉ. एम. ए. जमादार, डॉ. अनिता बंदीछोडे, डॉ. गजानन अल्पोवाड, डॉ. सिचन बांगर, डॉ. वैभव लादे, डॉ. विनय इंगळे, डॉ. शिरीष वळसंगकर आदी सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करतात. शहरात सर्पदंशाचे प्रमाण कमी आहे. हद्दवाढ भागातही अनेक घटना घडत असतात.
साप चावताच काय काळजी घ्यावी
साप चावल्यानंतर आवळपट्टी बांधावी. विषारी साप असेल तर तत्काळ शासकीय रुग्णालयात (दोन तासांच्या आत) ॲडमिट करावे. विषारी असेल तर मळमळ होते, उलटी होते. बिनविषारी असेल तर जिथे चावलेला असतो तिथे थोडे दुखल्यासारखे होते. साप चावल्यानंतर न घाबरता दवाखान्यात गेले पाहिजे. डॅाक्टरांना कल्पना देऊन ॲडमिट झाल्यास धोका टळतो, अशी माहिती नॅचरल ब्लु कोब्रा संघटनेचे दीपक इंगळे, अनिल अलदर व कमलाकर बनसोडे यांनी दिली.
जिल्ह्यात आढळणारे साप
जिल्ह्यात घोणस, मणियार, कोब्रा, पवळा, फुरसे, नाकाड्या आदी विषारी साप माळरानावर, शेतामध्ये आढळतात. तर अन्य बिनविषारींमध्ये धामण, कुकरी, तस्कर, कवड्या, धूळ नागीण, गवत्या हे सापही आढळतात. पानधीड (इरूळा) हा साप पाण्यात आढळतो. याबरोबर अन्य काही जातीचे सापही आढळतात. हरण टोळ, मांजऱ्या हे दोन साप अर्ध विषारी आहेत, मात्र ते अभयारण्यात आढळतात.
दंश झाल्यास होतो मोफत उपचार
सर्पदंश झालेल्या रुग्णांसाठी सरकारी दवाखाना किंवा सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात लस व औषध, गोळ्या ठेवण्यात आल्या आहेत. हे सर्व मोफत असून यासाठी पैसे घेतले जात नाहीत.