- संताजी शिंदे
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ४२ संशोधक व शिक्षकांना जागतिक ए. डी. सायंटिफिक इंडेक्स या संशोधन यादीत मानांकन प्राप्त झाल्याची माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी दिली. अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील प्रा. मुरत आल्पर आणि प्रा. सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे आल्पर डॉजर सायंटिफिक इंडेक्स तयार केला आहे. त्यात जगातील २१८ देशातील २२३५० विद्यापीठातून व २५६ विविध शाखांमधून जागतिक संशोधकांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. ४२ संशोधक व प्राध्यापकांना जागतिक मानांकन प्राप्त झाले आहे. त्यांनी केलेल्या संशोधन कार्याची दखल घेऊन जागतिक संशोधन क्रमवारीत त्यांना हे यश प्राप्त झाले आहे. संशोधन क्रमवारी गुगल स्कॉलरमधील संशोधकांच्या अद्यावत माहिती वरून तयार केली आहे. त्यामध्ये संशोधकांचे नाव, विद्यापीठाचे नाव, देशाचे नाव तसेच एच इंडेक्स, आय टेन इंडेक्स व सायटेशनचा समावेश आहे. या माहितीवरून संशोधकांची जागतिक, राष्ट्रीय व विद्यापीठातील क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.