आप्पासाहेब पाटील
सोलापूर : अपघातग्रस्त स्थळांची माहिती वाहनचालकांना नसल्याने मागील वर्षभरात १ हजार २८८ अपघातात ६५१ जणांचा मृत्यू तर ८०१ जण गंभीर जखमी झाले. शहर व ग्रामीण भागातील वाढते अपघात कमी करण्यासाठी जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांचे (ब्लॅक स्पॉट) उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात अपघात व जखमींच्या संख्येवरून जिल्ह्यात एकूण ४४ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली.
जिल्ह्यातील एकूण ४४ ब्लॅक स्पॉट असल्याचे आढळल्यानंतर त्यांचा अहवाल राज्याच्या परिवहन विभागासह केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे. या स्पॉटचे जिओ टॅगिंग करण्यात आले असून, प्रवाशांना त्याची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे़ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने जिल्हा पातळीवर रस्त्यावरील ब्लॅक स्पॉटची यादी नव्याने तयार करण्याचे निर्देश राज्याच्या परिवहन आयुक्तांनी दिले होते.
या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्टÑ रस्ते विकास महामंडळ व रस्ते बांधणीत सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे याची जबाबदारी देण्यात आली होती़ त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभागाशी संपर्क साधून जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट निश्चित केले.
या ठिकाणी होतात सर्वाधिक अपघात (ब्लॅक स्पॉट)
- - सोलापूर शहर पोलीस हद्दीतील केगाव, जुना पुणे नाका, बसस्थानक, मार्केट यार्ड, जुना विजापूर नाका, कंबर तलाव, सोरेगाव चौक तर पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत ग्रामीण हद्दीत पाकणी फाटा ते सोलापूर ते पुणे, चिंचोळी काटी, भीमानगर हॉटेल प्राची, वाघोली शिवार, कुरूल ते परमेश्वर पिंपरी, कामती ते सरकोली या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात अपघात होतात, असे सांगण्यात आले आहे़ म्हणून ही ठिकाणे ब्लॅक स्पॉटच्या यादीत समाविष्ट आहेत़
निधीसाठी विभागांचे शासनाकडे प्रस्ताव
- - ब्लॅक स्पॉटच्या अहवालामध्ये दीर्घकालीन व अल्पकालीन अशा उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत़ या उपाययोजना पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे़ हा निधी मिळावा, यासाठी प्रत्येक विभागाने खर्चाचा अंदाजे अहवाल तयार करून तो निधी त्वरित मिळावा यासाठी त्या - त्या विभागाने शासनाकडे पाठविण्यास सांगण्यात आले आहे़
या निकषानुसार ठरली ब्लॅक स्पॉट ठिकाणे...
- - ब्लॅक स्पॉट ठरविण्यासाठी दिलेल्या निकषांप्रमाणे रस्त्यावरील साधारणत: ५०० मीटरचे तुकडे व जेथे मागील दोन-तीन वर्षांत झालेले अपघात, त्यातील जखमी व मृतांची संख्या यावरून हे ब्लॉक स्पॉट निश्चित करण्यात आले. या निकषानुसारच पोलीस ठाण्यात अपघाताच्या स्थळांबाबत असलेल्या नोंदी आणि त्या ठिकाणी झालेली जीवितहानी, जखमींची संख्या यांचा अभ्यास करून ब्लॅक स्पॉटची निवड करण्यात आली. ही स्थळे निवडल्यानंतर वाढत्या अपघातांना प्रतिबंध लावण्यासाठी ब्लॅक स्पॉटवर दीर्घकालीन व तात्पुरत्या उपाययोजनाही सुचविण्यात आल्या असल्याचे परिवहन विभागाने सांगितले़