पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीना नदीच्या पात्रालगत घाटणे व मोहोळ शिवारातील सीमेवर वाळूसाठा करून ठेवल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना मिळाली. त्यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल कदम, पोलीस नाईक शरद ढावरे यांच्या पथकाने धाड टाकली असता त्या ठिकाणी ४५ ब्रास वाळूसाठा असल्याचे दिसून आले. याबाबतची चौकशी केली असता ही वाळू सुदर्शन गायकवाड रा. मोहोळ व त्याच्या इतर साथीदाराने सीना नदीपात्रातून बाहेर काढून साठा करून ठेवल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हरिदास मधुकर थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुदर्शन गायकवाड (रा. मोहोळ) व त्याच्या इतर साथीदारांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मालती नांगरे करीत आहेत.