ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. २० : पंढरपूर शहरानजीक भीमा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या ४५ लाकडी होड्या, होळे येथे दोन वाळ वाहतक करणारे ट्रक व आंबे येथे अवैध बुरूम उपसा करणारे एक जसीबी मशीनसह दोन टिपर यावर कारवाई केली़ सुमारे ७० लाखांचा मुद्देमाल प्रांताधिकारी विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी पकडण्यात आला आहे. ही कारवाई तहसील कार्यालय, नगरपालिका व पोलीस विभागाच्या अशा एकूण ९४ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली़
पंढरपूर तालुक्यात भीमा नदीचे काठावर ४६ गावे आहेत. प्रांताधिकारी विजय देशमुख यांना या संदर्भात अनेक गावकऱ्यांनी अवैध वाळू उपशाची माहिती दिली होती. दरम्यान पंढरपूर नजीकच्या इसबावी येथे लाकडी होडीतून वाळू उपसा करण्याचे काम अनेक दिवसांपासून चालू होते़ त्यामुळे गुरूवारी पहाटे प्रांताधिकारी विजय देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पिंगळे यांनी मोटारसायकलवरून जाऊन इसबावी येथील ठिकाणची पाहणी केली. त्यानंतर तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी, तलाठी व न.पा.चे कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन ४ पथके तयार करण्यात आली.
गुरूवारी इसबावी येथील नदीपात्रात कारवाईला सुरवात केली. या कारवाईत पंढरपूर नजीकचा रेल्वे पूल ते गुरसाळे बंधारा दरम्यान अवैध वाळू उपसा करणारे ४५ लाकडी बोटी पकडून त्या जेसीपीने फोडण्यात आल्या. या कारवाई दरम्यान काही होड्या पळून जात असताना अग्निशामक दलाच्या पथकाने त्यांना पकडले़
तालुक्यातील आंबे येथे अवैध वाळूवर कारवाई करण्यास गेलेल्या पथकाला अवैध मुरूम वाहतुक करणारे एक जेसीबी मशीन व दोन टिपर आढळून आले असून त्याला ताब्यात घेऊन ते प्रांतकार्यालयात लावण्यात आले आहेत. दरम्यान तालुक्यातील होळे येथे अवैधरित्या वाळू वाहतुक करणारे दोन ट्रकही पथकाने ताब्यात घेतले़
तालुक्यातील भीमानदी काठ गुरूवारी दिवसभर ४ पथकांनी पिंजून काढल्याने अवैध वाळू वाहतूक व मुरूम वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़ या कारवाईत ४५ लाकडी बोटींचे सुमारे २२ लाख रूपये व एक जेसीबी, दोन टिपर व दोन ट्रक असा ४८ लाख रुपये असा एकूण सुमारे ७० लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. -------------------------९४ जणांचे जम्बो पथक़़या कारवाईत प्रांत व तहसील कार्यालयाचे ८ मंडल अधिकारी, ३६ तलाठी, २० कोतवाल, १० पोलीस पाटील, २० पोलीस अधिकारी व कर्मचारी असे एकूण ९४ अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. या कारवाईत प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार अविनाश पवार, अव्वल कारकून मनोज श्रोत्री, मंडल अधिकारी भडंगे, तलाठी काळेल, गायकवाड, शिर्के, गोरे, साठे यांनी चळे, आंबे, रांझणी, सरकोली या गावात अवैध वाळू जप्त करून अहवाल प्रांतकार्यालयाकडे सादर केला़ मंडल अधिकारी मुजावर, मज्जीद काझी, ढवळे यांच्यासह तालुक्यातील सर्व तलाठी या पथकात सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी केली.