सोलापूर : जिल्ह्यातील १०२९ ग्रामपंचायतींपैकी ७४८ ग्रामपंचायतींच्या हद्दीत ४७ हजार ४९ अतिक्रमणे असल्याची माहिती झेडपी सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांनी सोमवारी दिली. प्रधानमंत्री आवास योजना आणि अन्य घरकूल योजना राबविण्यासाठी ही बांधकामे नियमित करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाच्या वतीने ग्रामीण भागात घरकूल योजना राबविली जाते. सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत अर्ज केलेल्यांना २०२२ पर्यंत घरे बांधण्यासाठी अर्थसाह्य करण्यात येत आहे.
जागेअभावी संबंधित लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नयेत म्हणून फक्त निवासी प्रयोजनासाठी शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमाकुल करण्यात येणार आहे. अशाप्रकारे यापूर्वी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्यांची नोंद शासन दरबारी आॅनलाईन पद्धतीने करण्यासाठी अतिक्रमण नियमाकुल प्रणाली विकसित करण्यात आली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत नोंद घेण्यास मुदत देण्यात आली होती. यात ७४८ ग्रामपंचायतींच्या हद्दीत ४७ हजार ४९ अतिक्रमणे असल्याची नोंद आली आहे.
आॅनलाईन प्रणालीवर घेण्यात आलेल्या या नोंदीवर इतर ग्रामस्थांचे आक्षेप राहू नयेत, यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात ठळक भागात या अतिक्रमणाच्या नोंदी लावण्याच्या सूचना ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत. ज्यांना एखाद्या अतिक्रमणाबाबत आक्षेप घ्यायचा आहे, अशांनी संबंधित ग्रामपंचायतीत उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातील अर्जात करावा. अतिक्रमणाची नोंद घेताना फक्त २०११ पूर्वीच्या अतिक्रमणाचा विचार केला गेला आहे.
परंतु यात अशा अतिक्रमणाची नोंद घेतली गेली नसल्याचे निदर्शनाला आल्यास याबाबतही आक्षेप नोंदविता येणार आहे. ग्रामस्थांकडून आलेल्या सूचना व हरकतींची नोंद घेऊन अतिक्रमण नियमाकुल करण्याच्या आॅनलाईन प्रणालीत नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध केलेल्या अतिक्रमणांची माहिती घेऊन आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन सीईओ डॉ. भारूड यांनी केले आहे.