मागील चार वर्षांपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली होती. गल्लीबोळातील गावगुंड रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालत होते. यामुळे अनेक ठिकाणी चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. रात्रीच्या वेळी शहरात फिरताना स्वामी भक्तांना याचा त्रास होत होता. यामुळे तत्कालीन पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी लोकवर्गणीतून १५ लाख रुपये खर्चून ४८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याचे संच उभे केले होते. यासाठी सहा महिन्याचे कालावधी लागला होता. त्यानंतर येणाऱ्या अधिकाऱ्यांनी केवळ लक्ष ठेवून किरकोळ देखभाल दुरुस्ती करून चालू ठेवायचे होते. यासाठी दरमहा केवळ पाच हजार रुपये लागणार होते. तेही परवडत नसल्याचे कारण पुढे करून विद्यमान पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांनी त्याची दुरुस्ती केली आहे.
या कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली होती; मात्र आता शहरात चोरीचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत.
या ठिकाणचे कॅमेरे बंदस्थितीत
मंगरुळे चौक ३, एवन चौक ४, शिवछत्रपती शॉपिंग सेंटर ३, फत्तेसिंह चौक २, सुभाष गल्ली ४, स्वामी समर्थ मंदिर पश्चिम गेट ३, एसटी स्टॅण्ड ४, विजय कामगार चौक ३, उत्तर पोलीस ठाणे ३, मेनरोड ४, स्वामी समर्थ मंदिर ४, अन्नछत्र गेट २ असे विविध ठिकाणी ४८ कॅमेरे बसविण्यात आले होते. सर्व बंद कॅमेरे दुरुस्त करून देखभाल करण्यासाठी ठेकेदार इब्राहिम कारंजे यांना ठेका देण्यात आला होता. पोलीस ठाणे व नगरपालिका यांनी दिलेल्या शब्दामुळे त्यांनी स्वखर्चातून कामे करून चालू करून दिले होते. त्यानंतर त्यांचे बिल कोणीच दिले नाही. याबाबत त्यांनी दोघांकडे पत्रव्यवहार केला; पण त्याची दखल घेतली नाही.
कोट :::::::::
शहरात लोकवर्गणीतून सीसीटीव्ही लावणे हे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. आता सीसीटीव्ही बंदबाबत अनेकांनी तक्रारी दिल्या आहेत. कॅमेऱ्यांमुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चांगली मदत होत असते. सर्व कॅमेरे किरकोळ खर्चाअभावी बंद असणे दुर्दैव आहे. ते सर्व लवकरात लवकर सुरू करू.
- डॉ.संतोष गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी