विलास जळकोटकर, सोलापूर : क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देण्यासाठी फसवी लिंक पाठवून महाविद्यालयीन लिपिकाला ४८ हजार ५६६ रुपयास गंडवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. शकील मुर्तूज हिरोली (वय ४६, मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी शहरातील एका महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. ४ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते कॉलेजमध्ये काम करीत असताना अज्ञात व्यक्तीकडून १८६०५००५५५ या क्रमांकावरुन फोन आला. त्याने ॲक्सिस बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून फिर्यादीला क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देण्यासाठी कॉल केला व एक लिंक एसएमस केला. ती लिंक ओपन करुन फिर्यादीने स्वत:ची जन्मतारीख टाकल्यानंतर आलेला कोड लिंकला शेअर केल्यावर क्रेडिट लिमिट वाढेल असे आमिष अज्ञाताकडून दाखवण्यात आले.
फिर्यादीचा विश्वास संपादन करुन संबंधित अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या खात्यातील ४८ हजार ५६६ रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी फिर्यादीने जेलरोड पोलीस ठाण्यात दधाव घेऊन तक्रार दिली असून, तपास पोलीस निरीक्षक बिराजदार करीत आहेत.