सोलापूर : २०१९ वर्ष जसं गेलं, तसंच यंदाचं २०२० वर्षही जाणार. याचा अर्थ पाऊस चांगलाच बरसणार अन् साºयांचेच दर स्थिर राहणार असल्याची भाकणूक वासºयाच्या हालचालींच्या अंदाजावरुन मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी बुधवारी रात्री केली. यंदाही पाऊस चांगला बरसणार असल्याची भाकणूक समजताच उपस्थित भक्तगणांनी श्री सिद्धरामांचा जयघोष केला.
होमविधीचा सोहळा आटोपल्यावर रात्री ११.१५ वाजता मानकरी राजशेखर हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू हे डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहासमोरील भाकणूकस्थळी आले. मानकरी राजशेखर देशमुख, सुदेश आणि सुधीर देशमुख हेही तेथे आसनस्थ झाले. दिवसभर उपाशी ठेवलेल्या देशमुख यांच्या शेतातील वासराला सिद्धेश थोबडे यांनी रात्री ११.२८ वाजता भाकणूकस्थळी आणले. ११.३८ मिनिटांनी सातही नंदीध्वज विसावताच वासराची राजशेखर देशमुख यांनी पूजा केली. वासरासमोर गूळ, गाजर, बोरं, खोबरे, खारीक, पान, सुपारी, धान्य ठेवण्यात आले. वासराने कशालाच स्पर्श केला नाही. यावरुन साºयांचेच दर स्थिर राहणार असल्याचे हिरेहब्बू यांनी सांगितले. वासराने मूत्र विसर्जन केले नाही, यावरुन पावसाचे काय ? असा प्रश्न विचारताच हिरेहब्बू यांनी २०१९ मध्ये जसा चांगला पाऊस पडला तसाच पाऊस पडणार असल्याचे सांगितले.
वासरासमोर पेटता दिवा (मशाल) धरण्यात आला. वासरु बिथरला नाही. त्याची हालचाल स्थिर होती, यावरुन या वर्षात भय, भीती नसेल, अशी भाकणूकही हिरेहब्बू यांनी केली. ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील भाकणूक आजपर्यंत सत्यात उतरली असल्याचे हिरेहब्बू यांनी उपस्थित भक्तगणांच्या स्मरणात आणून दिले. भाकणूक संपताच मानाचे सातही नंदीध्वज रात्री उशिरा हिरेहब्बू वाड्याकडे मार्गस्थ झाले.