सोलापूर : पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या ८४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम निधीअभावी रखडले आहे. भूसंपादनासाठी नवीन संस्था नियुक्त करणे व नवीन रेल्वे मार्गाची गणना करण्याच्या कामासाठी एजन्सी नेमणूक करावयाची प्रक्रिया पाच कोटींच्या निधीअभावी प्रलंबित आहे. निधीच्या मागणीसाठी सोलापूर विभागाने रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या २०१८-१९ च्या योजनेत सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली. वर्षभरापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते मुंबईत या रेल्वे मार्गाच्या कामाची सुरुवात झाली. त्यानुसार मुंबईतील रेल इंडिया टेक्निकल इकॉनॉमिक सर्व्हिसेस कंपनीतर्फे सर्व्हे करण्यात येत आहे. सर्व्हेचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित २० टक्के काम प्रगतिपथावर आहे. मार्गासाठी लागणाऱ्या जमिनी, स्थानकांवरील सोयीसुविधा, भुयारी मार्ग, फ्लाय ओव्हर याबाबत आराखडा तयार करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांची नेमणूक, मुख्य कार्यालय सोलापुरातच
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नव्या रेल्वे मार्गासाठी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. सोलापुरात सध्या सहायक रेल्वे अभियंत्याची नेमणूक करण्यात आली आहे. आता केलेल्या कामासाठी आणि भविष्यातील कामाच्या आवश्यकतेनुसार अधिकाधिक अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. भूसंपादनाच्या कामानंतर प्रत्यक्ष रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात होईल, त्यानंतर जास्तीत जास्त अधिकारी लागतील, असेही रेल्वेने सांगितले.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात मिळणार शेतकऱ्यांना नोटिसा
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या ८४ किलोमीटर कामासाठी ९५३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. भूसंपादनासाठी सोलापूर व उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित शेतकऱ्यांना भूसंपादनाची नोटीस देण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र हे काम फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात सुरू होणार आहे. त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. या मार्गावर ८ ते १० स्थानकांची निर्मिती होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भूसंपादनाच्या कामासाठी एजन्सीची नेमणूक करणे गरजेचे आहेे. एजन्सीची नेमणूक करण्यासाठी ५ कोटींचा निधी आवश्यक आहे. तो मिळविण्यासाठी रेल्वे मंत्रालय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. लवकरच हा निधी मिळेल अन् भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल. सध्या १ कोटीचा निधी शिल्लक आहे. तो उर्वरित सर्व्हेच्या कामासाठी पुरेसा आहे.
- नुरसलाम,
साईट इन्चार्ज, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग