सोलापूर : सोलापुरात गुरुवारी रात्री कुमठा नाका-नई जिंदगी रस्त्यावर क्रिकेट खेळण्यावरून व वाहनाला साईड देण्यावरून झालेल्या दगडफेकीत दोन पोलिसांसह पाच जण जखमी तर रिक्षा व जीपचे नुकसान झाले. या दगडफेकीत पो. काँ. गणेश विधाते, सुरेश कराडे व उमर फारुक शेख, प्रकाश सिद्धाराम पुजारी, संतोष रमेश कय्यावाले हे जखमी झाले.गुरूवारी सायंकाळी क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता. याचे पडसाद रात्री साडेआठ वाजता उमटले. कुमठा नाका ते नई जिंदगी रस्त्यावरील म्हेत्रे वस्तीजवळ गुरुवारी रात्री साडेआठच्या दरम्यान कट मारल्याच्या कारणावरून एमएच १३/ जी ३६५७ या क्रमांकाच्या रिक्षावर दगडफेक करण्यात आली. याचे पडसाद पुढे नई जिंदगी चौकात उमटले. गैरसमजातून दोन गट आमनेसामने आले व त्यांनी दगडफेक केली. यात एका टाटा सुमोचे नुकसान झाले. याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाणे व स्ट्रायकिंग फोर्सचे जवान घटनास्थळी आल्यावर जमाव पांगला. जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलिसाच्या पायाला दगड लागले. सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वातावरण शांत आहे. या घटनेनंतर शहरभर अफवांचे पीक पसरले. शास्त्रीनगर, आसरा चौकात अफवांमुळे पळापळ होऊन दुकाने बंद झाली. सर्वत्र पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली.
नई जिंदगीत दगडफेकीत २ पोलिसांसह ५ जखमी
By admin | Published: June 06, 2014 1:17 AM