बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर सोलापूरच्या दृष्टीने एक गोड बातमी आहे़ बाहेरुन येणाºया जड वाहनांना शहराच्या बाहेरूनच जाण्याची सोय व्हावी, ही मागणी अनेक वर्षांपासूनची आहे़ यातील एक महत्त्वाचा टप्पा पुढील सव्वा वर्षात पूर्ण होणार आहे़ बाळे ते हत्तूर बाह्यवळणाचा २१ किलोमीटरचा रस्ता सध्या प्रगतिपथावर आहे.
सध्या २५ टक्के काम पूर्ण झाले असून, मार्च २०२१ पर्यंत बाळे ते हत्तूर बाह्यवळणाचा रस्ता पूर्ण होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी ‘लोकमत’ला दिली.
सध्या युद्धपातळीवर सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे़ जवळपास ११० किलोमीटरचा हा रस्ता मार्च २०२१ पूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे़ या ११० किलोमीटर अंतर्गतच बाळे ते हत्तूर बाह्यवळणाच्या रस्त्याचे काम सुरु आहे़ बाह्यवळणाचा रस्ता २१ किलोमीटरचा आहे़ या २१ किलोमीटर कामास साधारण २८५ कोटी रुपयांचे खर्च येत आहे़ पुणे रोडजवळील जंगली हॉटेल ते बाळे, शिवाजीनगर, हिरज, बसवेश्वरनगर, बेलाटी, डोणगाव, नंदूर, शमशापूर ते हत्तूर असे एकूण २१ किलोमीटरचे काम सध्या सुरु आहे़ याकरिता तब्बल १२५ हेक्टर भूसंपादन करण्यात आले आहे़ मलेशिया येथील आयजेएम कंपनीकडून रस्त्याचे काम सुरु आहे़ आतापर्यंत एकूण २५ टक्के रस्त्याचे काम झाल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.
बाळे ते हत्तूर बाह्यवळणाचा रस्ता झाल्यानंतर विजयपूरहून येणारी जड वाहने बाळेमार्गे पुणे आणि हैदराबादकडे रवाना होतील़ तसेच पुणे आणि हैदराबादकडून येणारी वाहने बाळेमार्गे विजयपूरकडे रवाना होतील़ यामुळे शहराला लागून असलेल्या गावांना वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षा प्राप्त होईल़ तसेच शहरातून जाणाºया जड वाहनांना बाह्यवळणाचा पर्याय मिळाल्याने शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न कायमचा मिटेल़ अपघात कमी होतील़ शहर आणि शहर परिसरातील ट्रॅफिक कमी होईल़ याच धर्तीवर हत्तूर ते उळे हा ३३ किलोमीटरचा बाह्यवळणाचा रस्ता तसेच उळे-केगाव हा २० किलोमीटरचा बाह्यवळणाचा रस्ता व्हावा, अशी मागणीही अनेक वर्षांपासून होत आहे़ अद्याप या रस्त्यांना मान्यता मिळालेली नाही़ सोलापूर हद्दीबाहेरून एकूण ८० किलोमीटरचा बाह्यवळणाचा रस्ता पूर्ण झाल्यास संपूर्ण सोलापूर परिसरातील जड वाहतूक तसेच ट्रॅफिकचा प्रश्न कायमचा मिटेल, असे सोलापुरातील अनेकांना वाटते.
बाळे येथील रेल्वे ब्रिज कामामुळे मागील वर्षभरापासून बाह्यवळणाचे काम मंदगतीने सुरु आहे़ ब्रिज कामाला रेल्वे विभागाने आक्षेप घेतला होता़ या कामास पुनर्मान्यता मिळाली असून, यापुढे बाळे ते हत्तूर बाह्यवळणाच्या रस्त्याला गती मिळणार आहे़ मार्च २०२१ पर्यंत हा रस्ता पूर्ण करणे अपेक्षित आहे़ तोपर्यंत हा २१ किलोमीटरचा रस्ता पूर्ण होईल़ यासोबत सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गाचे कामदेखील प्रगतिपथावर आहे़- संजय कदम, प्रकल्प संचालक : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण