सोलापूर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यात बांधण्यात येणाºया घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास मोफत वाळू पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत. जिल्हाधिकाºयांनी दिलेले आदेश निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांच्याकडे दिले आहेत. त्याप्रमाणे प्रधानमंत्री, रमाई, शबरी पारधी आवास योजनेतील जिल्ह्यातील ५९५ गावातील ५०३४ लाभार्थ्यांना २० हजार ५८३ ब्रास वाळू वाटपाचे पास वितरित करण्यात येत आहेत.
अक्कलकोट तालुक्यात तडवळ येथे महसूल विभागाने चोरटी वाहतूक करणारी ६०० ब्रास वाळू जप्त केली होती. ही वाळू २१५ लाभार्थ्यांना तहसीलदार अंजली मरोड, गटविकास अधिकारी महादेव कोळी, सहायक महादेव बेळ्ळे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आली. गटविकास अधिकारी कोळी यांनी वाहनांची उपलब्धता करीत लाभार्थ्यांच्या घरापर्यंत ही वाळू पोहोच केली. यामुळे अक्कलकोटमधील घरकूल बांधणीच्या कामाला वेग येणार आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यात ४३८ लाभार्थी आहेत. याठिकाणी २०१९ ब्रासची मागणी आहे. त्याअनुषंगाने तहसीलदार जयवंत पाटील व गटविकास अधिकारी रंजना कांबळे यांनी लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करण्याची यंत्रणा लावली आहे. उत्तर पंचायत समितीतील कनिष्ठ सहायक जे. आर. अन्सारी व संबंधित गावच्या ग्रामसेवकांवर लवंगी येथून वाळू उपलब्ध करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याचबरोबर मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, माढा, माळशिरस, बार्शी, करमाळा, पंढरपूर, दक्षिण तहसीलदारांना वाळू उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
घरकूल लाभार्थीजिल्ह्यातील घरकूल लाभार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. गावे: ५९५, प्रधानमंत्री आवास योजना: १२६४, आवास योजना: ३७४२, शबरी आवास: १६, पारधी आवास: १२, एकूण घरकूल लाभार्थी: ५०३४. प्रत्येक लाभार्थी पाच ब्रासप्रमाणे एकूण वाळूची मागणी: २०५८३ ब्रास. घरकूल लाभार्थ्यांच्या नावे पाच ब्रास वाळू मोफतचा पास ग्रामसेवक, तहसीलमधील कनिष्ठ सहायकामार्फत उपलब्ध केला जातो. लाभार्थ्यांनी वाळू साठ्यातून स्वत:च्या खर्चाने वाहतूक करायची आहे.