करमाळा : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपचारासाठी बेडची कमतरता भासू नये म्हणून करमाळा शहरातील तीन खासगी हॉस्पिटलमध्ये ५० बेडची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी आढावा घेताना दिली.
जिल्हा शल्यचिकित्सक ढेले यांनी जेऊर ग्रामीण रुग्णालय येथे भेट देऊन कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याच्या तयारीची पाहणी केली. त्यानंतर करमाळा शहरात पवार हॉस्पिटल, शहा हॉस्पिटल, शेलार हॉस्पिटल या खासगी रुग्णालयांना येथे भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड १९ लसीकरण सत्र, महात्मा फुले जन आरोग्य योजना व इतर कामांचा आढावा घेतला.
त्यानंतर तहसीलदार समीर माने यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
या बैठकीस उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे व इतर अधिकारी उपस्थित होते. खासगी दवाखान्यात ऑक्सिजन बेड संख्या वाढवणे व जेऊर कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याबाबत चर्चा झाली. डॉ. पवार हॉस्पिटल, कमलाई हेल्थ सेंटर २५ बेड, डॉ. संदेश शहा हेल्थ सेंटर १० बेड व डॉ. शेलार कोविड सेंटर १० बेड सेंटर मान्यतेचा प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. उपजिल्हा रुग्णालय, करमाळा येथे सात बेड कार्यान्वित आहेत, अशी माहिती ढेले यांनी दिली.
----
०७ करमाळा कोरोना
करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालयात पाहणी करताना जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले.