सोलापूर : जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी ३0 हजारांची मागणी केली जाते असा आरोप सदस्याने केल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या सभेत गुरुवारी गोंधळ उडाला.
सुभाष माने यांनी जानेवारीच्या सभेत जातपडताळणी कार्यालयाकडे विद्यार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित असल्याने प्रवेशाला अडचण येत असल्याची तक्रार केली होती. या प्रश्नांकडे लक्ष वेधताना माने यांनी आज जातपडताळणी कार्यालयात प्रमाणपत्र देण्यासाठी ३0 हजारांची मागणी केली जाते, याचे माझ्याकडे पुरावे आहेत असा आरोप केला. यामुळे सर्व सदस्य अवाक् झाले. ही वस्तुस्थिती असल्याचे आनंद चंदनशिवे, उमेश पाटील यांनी निदर्शनाला आणले.
सहपालकमंत्री तानाजी सावंत यांनी जात पडताळणीचे जबाबदार अधिकारी कोण आहेत असा सवाल केला. याच दरम्यान जातपडताळणी विभागाच्या सचिव शोभा दराडे धावतच सभागृहात आल्या. एका प्रकरणाची सुनावणी असल्याने उशिरा आल्याचे कारण सांगून त्यांनी निवडणुकीसाठी आलेल्या सर्व प्रकरणांचा निपटारा केल्याचे स्पष्ट केले. प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे, ही प्रकरणे किती प्रलंबित आहेत असा सवाल सावंत यांनी केला.जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी तक्रारी वाढल्याने मी स्वत: जातपडताळणी कार्यालयास भेट दिली होती. तेथील कर्मचारी पैशाची मागणी करीत असतील तर संबंधितांनी लाचलुचपतकडे संपर्क साधावा असा खुलासा केला. आमदार बबनदादा शिंदे यांनी नदीकाठचा वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली.
प्रणिती शिंदे अनुपस्थित
- - जिल्हा नियोजन सभेला आमदार प्रणिती शिंदे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. मागील नियोजन बैठकीच्यावेळी केलेल्या आंदोलनप्रकरणात न्यायालयाने वॉरंट काढल्याने त्या आल्या नसाव्यात अशी सभास्थानी सदस्यांमध्ये चर्चा सुरू होती.
- - घाटणे बॅरेजमध्ये पाणी अडविणे व सीना भोगावती जोडकालव्याचे काम करण्यात यावे अशी मागणी उमेश पाटील यांनी केली. त्यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी हे काम होण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी तरतूद करू असे सांगितले.