अक्कलकोट : अक्कलकोट येथे आरटीओच्या वतीने (उपप्रादेशिक परिवहन कार्यालय) महिन्यातून दोन वेळा शिबीर घेतले जाते़ यामध्ये गरजूंना ठराविक कालावधीत लर्निंग व पक्के लायसन देणे गरजेचे आहे, परंतु तसे न होता अनेक प्रकरणे प्रलंबित ठेवले जातात़ त्यात ५०० प्रकरणांचा समावेश आहे़ परिणामी वाहनधारकांमधून आरटीओ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाविषयी संताप व्यक्त केला जातो़ अक्कलकोट येथे महिन्यातून दोन वेळा शिबीर घेतले जाते़ सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यास शिबिरानंतर लर्निंग लायसन तीन दिवसांत तर पक्के लायसन १५ दिवसांत देणे गरजेचे आहे़ परंतु लर्निंग लायसन महिन्यानंतर तर पक्के लायसन तीन-तीन महिने दिले जात नाही़ काही तरी कारण सांगून हे काम प्रलंबित ठेवले जाते़ सध्या ५०० प्रकरणे प्रलंबित आहेत़ नवीन वाहन घेतल्यानंतर पासिंग केल्याशिवाय रस्त्यावर चालवता येत नाही, असा आरटीओचा नियम आहे़ परंतु येथील शिबिरात पासिंग केले जात नाही़ नवीन वाहन घेऊन येणाऱ्या वाहनधारकांना सोलापूरला पाठविले जाते़ मग येथे शिबीर घेऊन अधिकारी व कर्मचारी काय काम करतात, असा प्रश्न संतोष स्वामी, बसवराज बिराजदार, दत्तात्रय सांगळे, विजय मलंग या वाहनधारकांनी केला आहे़ त्यामुळे येथील शिबीर म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशीच स्थिती आहे़ --------------------------------जिल्ह्यात सर्वच ठिकाणची प्रकरणे प्रलंबित आहेत़ त्यामुळे सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना बोलावून ही प्रकरणे मार्गी लावण्यात येतील़ वाहन कर भरणे ही कामे तांत्रिक कारणामुळे शिबिरादरम्यान होऊ शकत नाहीत़- गुंजाळ,सहा़ प्रादेशिक परिवहन अधिकारी
आरटीओत अक्कलकोटची ५०० प्रकरणे प्रलंबित
By admin | Published: July 12, 2014 12:43 AM