कुरूल : महावितरणची मोहोळ तालुक्यातील शेतक-यांकडील शेतीपंपाची एकूण थकबाकी ५०६ कोटी, तर कुरूल उपकेंद्रांतर्गत ११७ कोटींची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना २०२१ सुरू केली आहे. या योजनेचा पहिला लाभ कुरूल शाखेमधील कुरूलचे शेतकरी कृष्णदेव नागनाथ पाटील व एकनाथ विठ्ठल पाटकर या शेतक-यांनी घेतला आहे.
या शेतक-यांकडे सामायिक वीज कनेक्शनपोटी एक लाख ४५ हजार रुपयांची थकबाकी होती. या दोन शेतक-यांनी कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेत थकबाकीवरील व्याज व विलंब आकार कमी करून घेऊन ६ जानेवारी रोजी ५९ हजार ६०० रुपये रोख रक्कम महावितरणच्या कुरूल शाखा कार्यालयात भरली असल्याचे कुरूल शाखा अभियंता रेहमान आत्तार यांनी सांगितले.
महावितरणचे शाखा अभियंता रेहमान आत्तार यांनी कृष्णदेव पाटील व एकनाथ पाटकर या दोन शेतक-यांचा शाखा कार्यालयात बोलावून थकबाकी भरून सहकार्य केल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
----
कुुरूल उपकेंद्रांतर्गत ११७ कोटींची थकबाकी
महावितरणच्या कुरूल उपकेंद्रांतर्गत कुरूल, अंकोली, शेजबाभुळगाव, औंढी, वरकुटे, सय्यद वरवडे, कातेवाडी, परमेश्वर पिंपरी, गोटेवाडी, नांदगाव, नजीक पिंपरी, ढोकबाभूळगाव या १२ गावांत शेतक-यांकडे कृषीपंपाची ११७ कोटी थकबाकी आहे. यातील व्याज व विलंब आकार माफ होऊन उर्वरित ५० टक्के रक्कम ५८ कोटी रुपये शेतक-यांना भरायचे असल्याचे अभियंता आत्तार यांनी सांगितले.
उपकार्यकरी अभियंता हेमंत ताकपेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता रेहमान आतार, लाइनमन एन.यू. पाटकर, राजेंद्र जाधव, जनमित्र रघुनाथ घोडके, पद्मसिंह जाधव, सोनू गायकवाड, रायगौडा पाटील, सुनील जाधव, राहुल जाधव, दीपक जाधव, रवी नागरगोजे हे कर्मचारी थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करीत आहेत.
----
फोटो : ०७ कुरुल
कृष्णदेव पाटील व एकनाथ पाटकर या शेतक-यांनी कृषीपंप थकबाकी भरल्याबद्दल सत्कार करताना शाखा अभियंता रेहमान आत्तार.