टेंभुर्णी : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण मार्चमध्ये ९९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. एप्रिलमध्ये मात्र फक्त १२ दिवसातच ही संख्या डबल झाली असून, १२ एप्रिल या एकाच दिवशी ५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच चार-पाच दिवसांपूर्वी नव्याने चालू करण्यात आलेले कोविड केअर सेंटरही ओव्हरफ्लो झाले आहे.
टेंभुर्णी शहर व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. दररोज वाढणारी रुग्णसंख्या, टेस्टिंगचे वाढलेले प्रमाण व लसीकरणासाठी होणारी गर्दी आणि दररोजची ओपीडी यामुळे टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर व कर्मचारी प्रचंड तणावाखाली काम करीत आहेत. यातच अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे आहेत. या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अमोल माने यांनी केले आहे.
टेंभुर्णी शहराची ३० ते ३५ हजार लोकसंख्या व परिसरातील खेड्यातील वीस ते पंचवीस हजार अशा ६० हजार लोकसंख्येला आरोग्यसेवा पुरवणे टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवाक्यात राहिलेले नाही. पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त करणे गरजेचे आहे.
१२ एप्रिल या एकाच दिवशी टेंभुर्णी शहरात ५५ रुग्ण आढळून आले तर २६६ टेस्टिंग करण्यात आल्या, तसेच ११६ पात्र नागरिकांना लसीकरण करण्यात आले. सध्या येथील लस संपल्याने लसीकरणही थांबवण्यात आले आहे.
---
टेंभुर्णीत उपचारांसाठी मंगल कार्यालय घेतले
तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार एप्रिल महिन्याच्या १२ तारखेपर्यंत तालुक्यात १०६० पॉझिटिव्ह आढळून आले. टेंभुर्णी शहरात १९७ रुग्ण एप्रिलमध्ये आढळून आले आहेत. शहरात वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता चार-पाच दिवसांपूर्वी टेंभुर्णी येथील मंगल कार्यालय ताब्यात घेऊन या ठिकाणी कोविड केअर सेंटर चालू करण्यात आले आहे. हे सेंटर हाऊसफुल झाले आहे. सध्या येथे ७० रुग्णावर उपचार चालू आहेत.