माळशिरस : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेक पदे रिक्त होती. याबाबत वारंवार पदे भरण्याची मागणी पंचायत समिती सदस्य अजय सकट आणि विविध संघटना व कार्यकर्त्यांनी केली होती. या अनुषंगाने नवीन वर्षात तालुक्यातील ५५ डॉक्टरांची नियुक्ती होणार आहे. यापैकी तालुक्यातील ३९ गावांत सध्या या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा देताना अनेक ठिकाणी अडचणी येत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना नियुक्त्या करण्याबाबत पंचायत समितीचे सदस्य अजय सकट यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा केला. याबाबतीत सरकारने सकारात्मक विचार करून सध्या तालुक्यात ३९ डॉक्टरांची प्रत्यक्ष नेमणूक केली आहे.