सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी गुुरुवारी सरासरी ५८. ४५ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान मोहोळ विधानसभा मतदारसंघात झाले असून सर्वात कमी मतदान सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात ५५.०८ टक्के झाले आहे. २०१४ च्या तुलनेत या निवडणुकीत २.५७ टक्के जादा मतदान झाले आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर महाराज, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत झाली. जिल्हा निवडणूक कार्यालयाने रात्री उशिरा मतदानाची आकडेवारी जाहीर केली. सर्वाधिक चुरस मोहोळ विधानसभा मतदारसंघात दिसून आली. गुरुवारी या भागातील अनगर परिसरात पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला होता. त्यामुळे तणाव होता.
मोहोळ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. भाजपने येथे बेरजेचे राजकारण जुळवून आणले होते. आता मतदार कोणाला कौल देतात याकडे लक्ष असेल. मोहोळनंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात ५९.४४ टक्के मतदान झाले आहे. हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. भाजपने मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादीचा एक गट फोडला होता. त्यामुळे मतदानात चुरस दिसून आली. सहा विधानसभा मतदारसंघातील मतदानाच्या तुलनेत सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ५५.०८ मतदान झाले आहे. या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत चुरस दिसून आली.
मोहोळ - ६४.०८ %, सोलापूर शहर उत्तर - ५८.७९ %, सोलापूर मध्य - ५५.०८ %, अक्कलकोट - ५६. ८६ %, सोलापूर दक्षिण - ५६.४९, पंढरपूर-मंगळेवढा - ५९.४४ %