सोलापूर : यंत्रमाग कामगार संघटनांना मागील वर्षी इतकेच म्हणजे ६ ते ८ टक्के बोनस येत्या आठवड्यात देण्यात येणार असल्याची माहिती यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी रविवारी दिली. दुसरीकडे कामगार संघटनांनी १५ टक्के बोनस देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
सोलापुरात १३०० कारखान्यांत ४० हजार यंत्रमाग कामगार काम करतात. त्यांच्या वेतनवाढीचा करार संपून दोन वर्षे होऊन गेली. अद्याप नवीन करार करण्यात आलेला नाही. कामगारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
अशा परिस्थितीत बोनसची रक्कम दुप्पट करावी, अशी मागणी लालबावटा यंत्रमाग कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऐन दिवाळीत ‘ईपीएफ’च्या विरोधात यंत्रमागधारकांनी बेमुदत बंद पुकारला होता.
महिनाभर कामगारांना रोजगार नव्हता. केवळ बोनसवर दिवाळी साजरी करावी लागली. यावर्षी परिस्थिती सुधारली असून, किमान १५ टक्के बोनस देण्यात यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. भिवंडी, इचलकरंजी, मालेगाव येथील कामगारांना किमान १८ ते २८ टक्क्यांपर्यंत बोनस दिला जातो. सोलापुरातच केवळ सहा ते आठ टक्के एवढी कमी रक्कम दिली जाते, ती वाढवून मिळावी, अशी मागणी लालबावटा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
नवीन वेतन करार करण्यासाठी आम्ही वारंवार मागणी केली होती. जिल्हाधिकाºयांच्या दालनात याविषयी बैठकही झाली होती. कारखानदारांच्या आडमुठ्या धोरणामुळे अद्याप नवीन करार झाला नाही. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दिवाळीनंतर हा लढा आणखी तीव्र करण्यात येणार आहे.- श्रीधर गुडेली,कार्याध्यक्ष, मनसे यंत्रमाग कामगार संघटना
तेलंगणामध्ये संक्रांतीच्या वेळी बोनस दिला जातो तर आंध्रामध्ये पाडव्याला. सोलापुरातील कारखानदारदेखील वेगवेगळ्या वेळी बोनस देतात. असे न करता दिवाळीला सरसकट बोनस दिला जावा, अशी आमची मागणी आहे. महाराष्टÑात दिवाळी हा सर्ण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
- व्यंकटेश कोंगारी,सचिव,लालबावटा यंत्रमाग कामगार संघटना