लोकमत न्यूज नेटवर्क, पंढरपूर: भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तळघर आढळले असून, त्यामध्ये पुरातन मूर्ती आणि काही नाणी मिळाली आहेत. मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू असताना हाती लागलेल्या या खजिन्यामुळे पुरातत्व अभ्यासकांना नवी दिशा मिळणार आहे.
मंदिराच्या तळघरात शुक्रवारी सायंकाळी पुरातत्व विभाग व मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवेश केला. तेथे श्री विष्णूच्या दोन मूर्ती आणि महिषासूर मर्दिनीची मूर्ती, पादुका आणि अन्य दोन छोट्या अशा एकूण सहा मूर्ती आढळून आल्या. सोळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाणे यांनी व्यक्त केला. संशोधनानंतर आयुर्मान काढले जाईल.
श्री अष्टभुजा देवीची मूर्ती पाषाणाची अत्यंत सुबक असून मूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा, कमळ आहे. श्री विष्णूची मूर्ती तीन ते साडेतीन फूट उंचीची आहे. या मूर्तीला चार हात आहेत. हातात शंख, गदा, त्रिशूळ आहे.