सोलापूर : बेरोजगार असल्याचा गैरफादा उठवत दोघांनी मिळून तरुणाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट ऑफर लेटर देऊन त्याच्याच्यासह त्याच्या मित्राकडून एकूण ५ लाख ९७ हजार रुपयांला गंडवल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
महिबूब हसनसाब हेमुने (रा. मड्डी वस्ती, होटगी स्टेशनजवळ, सोलापूर), अकबर धवलजी शेख (रा. मित्र नगर, शेळगी, सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी माधुरी संजय कोपरे यांनी फिर्याद दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, फिर्यादीचा मुलगा अक्षय याचा विश्वास संपादन करुन नमूद दोघांनी त्याच्याकडून नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार एन. टी. पी. सी. कंपनीच्या अधिकाऱ्यांचे सही, शिक्का असलेले बनावट आभार लेटर, ट्रेनिंग लेटर, नेमणुकीचे पत्र, ऑफर लेटर फिर्यादीचा मुलगा अक्षय याला दिले. या बदल्यात त्याच्याकडून ५ लाख ५० हजार रुपये घेतले. हा प्रकार २२ नोव्हेंबर २०२३ रोजी काडादी चाळ येथे घडला.
याचबरोबर फिर्यादीच्या मुलगा अक्षय याचा मित्र अमोल शरणबसवेश्वर तारापूर याच्याकडूनही अशाच प्रकार फसवणूक करुन ४७,५०० रुपये घेतले. प्रत्यक्षात नोकरी न लावता पैशाबद्दल पाठपुरावा करुनही आजतागायत परत केले नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सदर बझार पोलिसांनी भा. दं. वि. ४२० अन्वये गुन्हा नोंदवून घेतला आहे. पुढील तपास महिला सहा. पोलीस निरीक्षक कुदळे करीत आहेत.