सोलापूर : सोलापूरहून पुणेच्या दिशेने ६० पोती गुटका घेऊन निघालेला टेम्पो माेहोळ पोलिसांनी पकडला. ३२ लाख ४० हजारांचा गुटखा आणि १५ लाखांचे वाहन असा ४७ लाख ४० हाजारांचा मुद्देमाल मोहोळ पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मंगळवार, २५ एप्रील रोजी मध्यरात्री ०१: १५ वाजण्याच्या सुमारास मोहोळ शहराजवळ कन्या प्रशाला चौकात पोलिसांनी ही कारवाई केली.पोलीस सूत्राकडील माहितीनुसार सोलापूरहून पुण्याच्या दिशेने एक लाल रंगाचा टेम्पो (टी.एस. १२/ ४३५३) हा गुटखा घेऊन पुण्याकडे निघाल्याची माहीती पोलिस निरीक्षक विनोद घुगे याना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलिस हवालदार नीलेश देशमुख, पोलिस नाईक अशपाक शेख, पोलिस हेड कॉन्स्टेबल मंगेश बोधले, वसीम शेख, कैलास डाखोरे यांनी महामार्गावर कन्याप्रशाला चौकात सापळा रचला.
२५ एप्रील रोजी मध्यरात्री ०१:१५ वाजता पुण्याकडे निघालेला लाल रंगांचा टेम्पो अडविला. चौकशीत चालक कासिम मैनोद्दिन गोलंदाज (रा. चिंचोली, सहयाखान, तालुका निलंगा, जि. लातूर) याने टेम्पोमध्ये गुटखा सुपारी असल्याचे सांगत मालाची बिल्टी नसल्याचे म्हणाला. पोलिसांना वाहनामधील मालाचा संशय आला अन टेम्पोमधील मालाची तपासणी केली. या कारवाईत प्रतिबंधीत बारातीपान मसला व बी ९ तंबाखुचे एकूण ६० पोती आढळले. या दरम्यान चालक कासिम गोलंदाज याला जागीच ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाई करीता पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधला. अधीक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करीत आहेत.