सांगोला : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबऱ्यांकडूनव मिळालेल्या माहितीनुसार सांगोला पोलिसांनी तीन ठिकाणी अचानक धाडी टाकल्या. यात विनापरवाना अवैधरित्या नवसागर, युरिया, पाणी व गुळापासून हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे ३ हजार लिटर कच्ची दारू तथा गूळमिश्रित रसायन, नवसागर कांड्या, युरिया, १५ बॅरल असा सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व जागेवरच नष्ट केला. ही कारवाई पाचेगाव बुद्रुक व लोटेवाडी येथे केली.
पोलीस कारवाईदरम्यान आनंदा ऊर्फ अण्णा राजाराम सावंत (रा. लोटेवाडी) मधुकर दादू चव्हाण व अमर दिलीप चव्हाण (दोघे रा. पाचेगाव बुद्रुक) पोलिसांना पाहून पळून गेले.
आगामी गणेश उत्सव, गौरी, गणपती सण शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी तालुक्यातील विनापरवाना, हातभट्टी तयार करणाऱ्या अड्ड्यावर धाडी टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर ,पोलीस हवालदार नागनाथ क्षीरसागर, पोलीस धुळा चोरमले, रामचंद्र जाधव असे मिळून कटफळ हद्दीत पेट्रोलिंग करत असताना लोटेवाडी येथील दिनकर लवटे यांच्या शेतात आनंदा ऊर्फ अण्णा राजाराम सावंत हा चोरून हातभट्टीची दारू तयार करत होता. पोलिसांनी अचानक धाड टाकली असता तो पळून गेला. पोलिसांनी येथून ४ प्लास्टिक बॅरलमधील ८०० लिटर तयार हातभट्टीची दारू, ३ नवसागर कांड्या, १ किलो युरिया असा सुमारे १६,८३७ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर, पोलीस हवालदार बनसोडे पोलीस नाईक कोष्टी, धनंजय इरकर हे पेट्रोलिंग करत असताना मिरज पाचेगाव बु येथील चिलारीच्या झुडपांमध्ये अमर चव्हाण व मधुकर दादू चव्हाण असे दोघे मिळून हातभट्टी चालवत होते. येथे छापा टाकून २२०० लिटर गूळमिश्रित रसायन, दोन किलो युरिया, नवसागरच्या कांड्या ११ लोखंडी बॅरेल असा सुमारे ३४,३२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस रामचंद्र जाधव व पोलीस धनंजय इरकर यांनी तिघांविरुद्ध फिर्याद दिली आहे.