अमित सोमवंशीसोलापूर दि १९ : शहर आणि ग्रामीण भागातील आरोग्य बिघडत असल्याचे वास्तव राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यामार्फत पुढे आले आहे. मागील चार वर्षांत जिल्ह्यात ६२० बालके हृदयरोगाने पिडीत असल्याचे आढळून आले असून त्यापैकी ५९८ मुलांवर हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली. २२ बालकांच्या पालकांनी शस्त्रक्रियेला नकार दिल्याने त्यांचा जीव धोक्यात असून दैवावर हवाला ठेवून ही बालके जगत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांकडून वर्षभरात दोन वेळा विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. ज्यांना हृदयविकार आहे, अशांना शस्त्रक्रियेसाठी सोलापूर, पुणे व मुंबई अशा विविध ठिकाणी पाठविण्यात येते. शस्त्रक्रियेसाठी पाठविलेल्या एका विद्यार्थ्यासोबत असलेल्या एका नातेवाईकाचा पूर्ण खर्चसुद्धा मोफत करण्यात येतो. जिल्ह्यातील अंगणवाड्या व पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यात सोलापूर जिल्ह्यात २०१४ ते २०१७ दरम्यान राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत ० ते ६ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ३६१ बालके हृदयरोगाने पीडित आढळले. त्या सर्वांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे दिसून आले. त्यापैकी ३०० बालकांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ३७२ जणांना हृदयरोग असल्याचे निष्पन्न झाल्यावर २९८ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रिया मोफत होत्या. तरीही २२ पालकांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे. १३५ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. काही विद्यार्थ्यांचा हृदयविकार औषधोपचाराने ठीक होणार असल्याचे तपासणीत दिसून आले. तर काही पालकांनी खासगी रुग्णालयात त्यांच्या पाल्यावर उपचार केले.
-----------------------आरोग्य तपासणीसाठी पथकेसोलापूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी तालुकानिहाय पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यात सोलापूर महानगरपालिका ५, मंगळवेढा ३, मंद्रुप ४, पंढरपूर ५, करकंब १, वडाळा ४, मोहोळ ४, करमाळा ३, बार्शी ३, पांगरी १, सांगोला ५, कुर्डूवाडी / माढा ४, अक्कलकोट ४, माळशिरस ७ अशी पथके स्थापन करण्यात आली आहेत.-----------------शस्त्रक्रिया होणारच! बालकांच्या पालकांनी हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे; मात्र बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात येतील. त्यासाठी पालकांना समजावून सांगण्यात येईल. पालकांची भेट घेऊन त्यांना मानसिकदृष्ट्या तयार करण्यात येईल. ते तयार झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात येतील, असे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.-------------काय आहे योजना ?राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत बालकांची आरोग्य तपासणी दरवर्षी केली जाते. या तपासणीत विविध आजारांनी पीडित बालकांवर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे दिसून आले. महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया केल्या जातात. एका शस्त्रक्रियेसाठी २ ते ८ लाख रुपयांचा खर्च असतो.