सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत मतदारांनी सरासरी 63.58 टक्के मतदान केले. ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड होणे व मतदार यादीत नाव नसल्याने गोेंधळ होणे आदी प्रकार मात्र या मतदानाप्रसंगीही दिसून आले.
सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत माढा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात मतदान घेण्यात आले. कडक उन्हामुळे सकाळी सात ते अकरा तर सायंकाळी चार ते सहा या वेळेत मतदारांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. सायंकाळी सहानंतरही ४७ मतदान केंद्रात सहापूर्वी मतदान केंद्रात आलेल्या मतदारांना मतदान करण्याची संधी देण्यात येत होती.
मतदार यादीत नाव तपासणी करण्याचे आवाहन मागील सहा महिन्यांपासून मतदारांना करण्यात येत होते. मात्र याकडे अनेक मतदारांनी लक्ष दिले नाही. ऐन मतदानाच्या दिवशीच मतदान यादीत नाव आहे की नाही, याची खात्री न करताच अनेक मतदार मतदान केंद्रात आले. मात्र अनेकांची नावे यादीत नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही. मतदार यादीबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती केल्यानंतरही असा प्रकार दिसून आला.
माढा लोकसभा मतदारसंघात एकूण १९ लाख ४ हजार ८४५ मतदार आहेत. यापैकी सायंकाळी सहापर्यंत १२ लाख ११ हजार ०४८ मतदारांनी मतदान केले. यावेळी ६ लाख ५६ हजार ७५३ पुरुष, ५ लाख ५४ हजार २९५ महिला तर ३ तृतीय पंथींनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत एकूण किती मतदान झाले याची माहिती घेण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र मतदारसंघात सरासरी ६३ टक्के मतदान झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. मागील लोकसभा निवडणुकीत ६२ टक्के मतदान झाले होते.