मंगळवेढा शहरालगत असलेल्या चोखामेळानगर परिसरात शुक्रवारी ५६ तर गणेशवाडी परिसरात ८ अशा ६४ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे सर्व्हेमध्ये निदर्शनास आले आहे. या मृत कोंबड्यांचे सँपल तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी मारापूर परिसरात ३२ व भालेवाडी परिसरात ५ अशा ३७ कोंबड्या मृत्यू पावल्या असून येथील परिस्थिती आता नियंत्रणाखाली असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.
भालेवाडी येथील १० कि. मी. परिसर सतर्क झोन म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घोषित केले आहे. तालुक्यात ३१ पोल्ट्री फार्म असून यामध्ये ३१ हजार कोंबड्या आहेत. तर १ लाख २७ हजार ७०० कोंबड्या या शेतकऱ्यांच्या आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पाच पथके तयार केली आहेत. तालुक्यात प्रथम जंगलगी येथे कोंबड्या मृत्यू पावल्या होत्या. त्यामध्ये ७५३ कोंबड्या मारल्या तर ११० अंडी नष्ट केली. शासनाकडून या पशुपालकांना मोठ्या कोंबडीस ९० रुपये तर छोट्या पिलास २० रुपये व प्रती अंडे ३ रुपयांप्रमाणे अनुदान वाटप करण्यात येणार आहे.