सोलापूर : जिल्ह्यामध्ये साप चावल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडल्याने साप चावण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. मागील सव्वा महिन्यात ६४ जणांना साप चावला.
पावसाळा सुरू झाल्याने साप दिसण्याचे प्रमाणही आता वाढताना दिसत आहे. साप चावण्याचे प्रकारही पावसाळ्यात जास्त असते; परंतु प्रत्येक साप हा विषारी असतोच असे नाही. जिल्ह्याचा विचार केला, तर या जिल्ह्यात सापांच्या तब्बल २७ जाती आढळून येत आहेत. यात विषारी, निमविषारी आणि बिनविषारी सापांचा समावेश आहे.
ग्रामीण भागामध्ये साप चावण्याचे प्रमाण हे शहरापेक्षा जास्त आहे. पायात चप्पल नसणे, विजेच्या अडचणीमुळे रात्री शेतीला पाणी देणे, चिखल किंवा उसाच्या शेतातून चालणे यामुळे साप हे पायाला चावा घेतात. कडबा किंवा इतर वस्तू उचलताना हाताला चावा घेण्याच्या घटनाही घडतात. काही वेळा साप हे आपल्या भक्ष्याच्या शोधात घरात किंवा अंगणात येतात. एखाद्या व्यक्तीचा चुकून धक्का लागला किंवा साप अंथरुणात आल्यासही सापाने चावा घेतल्याच्या घटना घडतात. सिव्हिल हॉस्पिटलच्या औषध वैद्यक शास्त्र विभागातर्फे साप चावलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येतात, अशी माहिती डॉ. विठ्ठल धडके यांनी दिली.
फक्त चारच साप विषारी
जिल्ह्यात २७ प्रकारचे साप आढळून येतात. यातील नाग, घोणस, मण्यार, फुरसा हे चार सर्वांत विषारी आहेत, तर इतर साप हे निमविषारी किंवा बिनविषारी असतात. मात्र, यातील कोणताही साप माणसाला चावला, तर तो विषारी आहे की बिनविषारी आहे, याची माहिती नसल्याने, माणूस घाबरल्याने त्याला अधिक त्रास होत असल्याचेही दिसून आल्याचे सर्पमित्र नॅचरल कॉन्झर्वेशन सर्कलचे पप्पू जमादार यांनी सांगितले.
--------
साप चावतात कुठे ?
- पायाला चावणे - ६० टक्के
- हाताला चावणे - २० टक्के
- इतर ठिकाणी - १८ टक्के
- स्टंट करताना - २ टक्के
उशिरा उपचारामुळे मृत्यू
साप चावल्याने तीन जणांचा मृत्यू झाला, तर उर्वरित रुग्ण हे बरे होऊन घरी गेले. मृत झालेल्या रुग्णांना उशिरा दाखल केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
- साप चावलेले एकूण रुग्ण - ६४
- रक्तवाहिन्यासंबंधी रुग्ण - ५८
- न्यूरोपॅरालाईटिक (मेंदूसंबंधी) रुग्ण - ६
साप चावल्यानंतर गरेजेचे सर्व प्रकारचे उपचार हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात येतात. काही रुग्णांना व्हेंटिलेटरचीही गरज पडते, तर काही रुग्णांच्या मूत्रपिंडावर परिणाम झाल्यास डायलिसिस करावे लागते. रुग्ण लवकर ॲडमीट झाल्यास त्याच्या पुढच्या आरोग्यविषयक अडचणी कमी होतात. त्यामुळे साप चावल्यास लगेच उपचारासाठी रुग्णालयात यावे.
- डॉ. रोहन खैराटकर, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय रुग्णालय, सोलापूर.
जिल्ह्यात २७ प्रकारचे साप आढळतात. त्यात ४ साप हे विषारी आहेत. पावसाळ्यात साप बाहेर निघण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. अशा वेळेस घाबरून न जाता, याची माहिती तत्काळ सर्पमित्राला देणे गरजेचे आहे. तसेच एखाद्याला साप चावलाच, तर त्याला रुग्णालयात तत्काळ उपचारार्थ दाखल करावे. तसेच त्याला धीर देणेही तितकेच महत्त्वाचे असते.
- पप्पू जमादार, सर्पमित्र, एनसीसीएस