सोलापूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर हयात असताना, एका जाहीर कार्यक्रमात नंतर त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. पुढे सोलापुरात मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ही परंपरा अखंडपणे चालू असून, याला ६५ पेक्षा जास्त वर्षांची परंपरा चालत आली आहे.
साठच्या दशकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सोलापुरातून दुसऱ्या गावी जात होते. जाता-जाता त्यांनी सोलापुरात विसावा घेतला होता. दरम्यानच्या काळात त्यांची सभा झाली, त्यामध्ये त्यांनी भाषण केले होते. तो दिवस दि.१४ एप्रिल होता, त्या दिवशी बाबासाहेबांचा वाढदिवस होता, हे काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. बुधवार पेठ येथील समाजबांधवांनी यांचा वाढदिवसानिमित्त हार व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार केला होता. तेव्हापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस आणि नंतर जयंती ही मोठ्या थाटामाटात सोलापुरात साजरी केली जाते. समाजामध्ये कितीही पक्ष किंवा गट-तट असले, तरी मिरवणूक एकच निघते, हे सोलापूरचे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सुभानजी बनसोडे यांनी सांगितली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हयात असताना दि.१४ एप्रिल रोजी १९५३ साली फॉरेस्ट येथे बैलगाडी मध्ये बाबासाहेबांचा फोटो लावून भीमसैनिकांनी मिरवणूक काढली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानंतर जयंती मिरवणूक काढण्यास सुरुवात झाली. ही परंपरा आजतागायत अखंडपणे सुरू आहे, अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांनी दिली.
साध्या पद्धतीने साजरी करा जयंती : राजाभाऊ सरवदे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सोलापूरची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात न्हवे ते देशात प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी व या वर्षी कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार मिरवणूक काढण्यात आली नाही. लोकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावं, गर्दी करू नये. आपल्या घरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं आणि साध्या पद्धतीने जयंती साजरी करावी, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी केले आहे.
गर्दी करून कोरोनाचा आमंत्रण देऊ नये : आनंद चंदनशिवे
कोरोनामुळे याही वर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काढता आली नाही. शासनाच्या आदेशाचे सर्वांनी पालन केला आहे. बहुजन समाजाची अस्मिता असलेली डॉ.आंबेडकर जयंती लोकांनी घरात राहून साजरी करावी. गर्दी करून कोरोनाला आमंत्रण देऊ नये. परवानगी असणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्याने पुतळ्यास अभिवादन करावे, असे आवाहन नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केले आहे.