सोलापूर : आंतरजिल्हा बदलीने सोलापूर जिल्ह्यातून ६६ शिक्षकांना पाठविण्यात आले. तर सोलापूर जिल्ह्यात १२२ शिक्षक येणे अपेक्षित असताना आत्तापर्यंत फक्त ५९ शिक्षक आले असून ६३ शिक्षकांची अजूनही प्रतिक्षा करावी लागत आहे.
ज्या जिल्ह्यामध्ये १० टक्के पेक्षा जास्त शिक्षकांच्या जागा रिक्त असतील, त्या जिल्ह्यातील शिक्षकांना बदलीने दुसऱ्या जिल्ह्यात पाठवता येत नाही. सोलापूर जिल्ह्यात शिक्षकांच्या १० टक्क्यांपेक्षा कमी जागा रिक्त असल्याने आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी सांगितले.
बदली झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांना १५ मेपर्यंत कार्यमुक्त करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे जून महिना सुरु होईपर्यंत ६३ शिक्षक सोलापूर जिल्ह्यात पुन्हा रुजू होणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षांपासून या शिक्षकांना शाळेत नियुक्ती दिली जाणार आहे.
पालघरमधून शिक्षक सोलापुरातग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार १० टक्के पेक्षा जास्त रिक्त पदे असलेल्या जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले आहे. पालघरची कार्यमुक्ती राहिली आहे. पालघरमधून आंतरजिल्हा बदली झालेले शिक्षकही लवकर कार्यमुक्त होतील व सोलापूर जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने येणारे शिक्षक जिल्ह्यात रूजू होतील, असे शिक्षक सहकार संघटनेचे राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांनी सांगितले.