बार्शी : अवैध धंद्याच्या विरोधात ग्रामीण पोलिसांनी धडक मोही हाती घेतली आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्याप्रमाणात अवैधधंदे सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांच्या अमली पदार्थविरोधी विशेष पथकाने बार्शीत धाड टाकून ६९५ ग्रॅम गांजा जप्तर केला. याप्रकरणी एकास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
ही घटना २१ जून रोजी घडली.
बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पथक फिरत असताना खबऱ्यामार्फत सुभाषनगर भागातील बार्शी ते ताडसौंदणेकडे जाणाऱ्या वीट भट्टीजवळ गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाली. माहितीनुसार घटनास्थळी पथक पोहचले असता कुमार एकनाथ मिरगणे (वय ६२, रा. सुभाषनगर बार्शी) हा विनापरवाना गांजा जवळ बाळगून तो विकताना सापडला.
याबाबत सहायक फौजदार सुधीर चंद्रकांत गायकवाड यांनी त्याच्याविरुद्ध शहर पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार कुमार एकनाथ मिरगणे त्याच्या ताब्यातील सुमारे पाच हजार रुपयांचा ६९५ ग्रॅम गांजा जप्त करून एनडीपीएस कायदा १९८५ कलम ८(क), २० (ब) २ (अ) प्रमाणे गुन्हा नोंदला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, विभागीय पोलीस अधीक्षक अभिजित धारशिवकर यांच्या मार्गदर्शनाली फौजदार माहूरकर व पोलीस पथकांनी केली आहे.
----