सोलापूर: चिंचोळी एमआयडीसीमध्ये टेक्स्टाईल्स क्लस्टरसाठी पूर्वी दिलेली सात एकर जागा बदलून देण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला़ राज्याचे उद्योग सचिव अपूर्व चंद्रा यांनी मंगळवारी चिंचोळी एमआयडीसीला भेट दिली, त्यावेळी हा निर्णय घेतला असल्याचे यंत्रमागधारक संघाचे राजू राठी यांनी सांगितले़ अपूर्व चंद्रा यांनी अक्कलकोट रोड एमआयडीसी आणि चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीतील महानगरपालिकेच्या सीईटीपीची (सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र) पाहणी केली़ यावेळी त्यांच्यासमवेत आयुक्त चंद्रकांत गुडेवार, टेक्स्टाईल्स क्लस्टर सेंटरचे अध्यक्ष चंद्रय्या ईराबत्ती, माजी खासदार धर्मण्णा सादूल, पेंटप्पा गड्डम, राजू राठी, महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार देशमुख यांच्यासह उद्योजक उपस्थित होते़ अक्कलकोट रोड एमआयडीसी भागात ३ एमएलडी क्षमतेने सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले आहे़ चेन्नईच्या वेबॅक यांना पाच वर्षे मनपाने मक्ता दिला़ आणखी दोन वर्षांनी हा मक्ता संपणार आहे़ यंत्रमागधारकांनी यासाठी पैसे देणे अपेक्षित आहे़ मात्र आयुक्त गुडेवारांमुळे १ कोटी २० लाखांचा निधी आला असून अद्याप ४ कोटी ५२ लाख उद्योजकांकडून येणे अपेक्षित आहे़
-------------------------------
हे केंद्र यंत्रमागधारकांनी चालविणे अपेक्षित होते़ मात्र एमआयडीसी, उद्योजक आणि मनपा यांच्यात झालेल्या करारानुसार मनपा हे केंद्र चालवित आहे मात्र यंत्रमागधारक याचे पैसे भरत नाहीत़ सध्या त्यांच्याकडे ३ कोटी ३२ लाख येणे आहे़ त्यामुळे हे केंद्र एमआयडीसीकडे वर्ग करावे, अशी मनपाची मागणी आहे़ - चंद्रकांत गुडेवार मनपा आयुक्त