सोलापूर : आपत्कालीन संकटे कोणत्या स्वरूपात शेतक-यांवर ओढावेल हे सांगता येणं शक्य नाही. अशीच घटना बार्शी तालुक्यात कुसळंब येथे घडली आहे. येथील कृष्णा कालिदास काशीद यांच्या गोठ्याजवळील कडब्याच्या गंजीला आग लागून दहा हजार पेंडी कडबा जळून सात लाखाचे नुकसान झाले.
कृष्णा काशीद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सर्वच नक्षत्रांनी पावसाने हुलकावणी दिल्याने जनावरासाठी कडबा ठेवलेला होता. परंतु २९ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जनावरास चारापाणी करून घरी गेले. जेवण आटोपून झोपलो असता मध्यरात्री अचानक चुलत भाऊ दिगंबर चक्रधर काशीद यांनी फोन केला, परंतु लागला नसल्याने तो घरी आला. त्याने कडब्याची गंजी पेटल्याची माहिती दिली. ते आणि भाऊ कपिल कालिदास काशीद व गावातील मित्रमंडळी गोट्याकडे धावले असता कडवब्याच्या गंजीने उग्ररूप धारण केलेले होते. शिवाय वारा असल्याने आग आटोक्यात येणे शक्य नव्हते. त्यामुळे आग वाढतच गेली.
प्रथम त्यांनी गंजी जवळील गोठ्यातील बांधलेली सर्व जनावरे सोडून दिली. त्यांना दुसरीकडे बांधले. त्यामध्ये एका वासराला थोडी हाय लागली आहे. आग लागल्याची माहिती समजताच गावकऱ्यांसह इतर नागरिक आग विझविण्यासाठी घटनास्थळी धावले. आग विझविण्याचा बराच प्रयत्न झाला. मात्र, आगीचा भडका अधिकच वाढला व परिसरात लागलेली आग विझविणे शक्य झाले नाही. या घटनेत सात लाखांचा कडबा पेंडी जळून खाक झाल्या.
अग्निशामक दलाला पाचारणदरम्यान गणेश पाटील, दत्तात्रय काशीद यांनी बार्शी येथील अग्निशामक दलास पाचरण केले. अग्निशामक गाडीने पाण्याचा फवारा मारला. आग लागल्याचे मुख्य कारण अजूनदेखील समोर आले नाही. मात्र आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील होत आहे.