सोलापूर : ब्रिटिश काळापासूनचे जिल्ह्यातील १८८० सालापासूनचे सातबारा, फेरफार, खाते उताऱ्यांचे रेकॉर्ड स्कॅन करून ठेवण्यात आले आहे. हे रेकॉर्ड ऑनलाइनवर लवकरच ते प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
सध्याच्या काळात एखादी जमीन खरेदी करायची म्हटले, की त्या जमिनीसंदर्भाचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे. अन्यथा लाखो रुपये मोजूनही खरेदी केलेल्या जमिनीबाबत अनेक कोर्ट-कचेऱ्यांची वारी करावी लागते. खरेदीपूर्वी मूळ जमीन कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. यासाठी फेरफार, सातबारा व खाते उतारे मिळवावे लागतात. पूर्वीही कागदपत्रे व जमिनीचा पूर्वेतिहास मिळवण्यात अडचणी येत होत्या. आता काही जिल्ह्यांमध्ये ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या जिल्ह्यांत व्यवस्थामुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, नंदूरबार, नाशिक, सिंधुदुर्ग, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांतील १८८० पासूनचे रेकॉर्ड सध्या ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे. उर्वरित १७ जिल्ह्यांत स्कॅनिंगचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच येथे फेरफार उतारे दिसतील.