सोलापूर : राष्ट्रीय महामार्गासाठी झालेल्या १४ गुंटे जमिनीऐवजी सातबारा उताऱ्यावर १.४० आर लागलेली नोंद दुरुस्तीसाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी उत्तर सोलापूर तहसीलमधील महसूल सहाय्यक अँटी करप्शन पथकाच्या सापळ्यात अडकला गेला. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. अतुल अशोक रणसुभे (रा. साईसृष्टी, राजस्व नगर, सोलापूर) असे या लोकसेवकाचे नाव आहे. यातील तक्रारदाराची सोलापूर ते सांगली राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ मध्ये बेलाटी (ता. उत्तर सोलापूर) येथील १४ गुंठे शेतजमीन बांधित झाली आहे. बाधित शेजमिनीपैकी सात बारा उताऱ्यावर मात्र ०१.४० आर एवढ्ळात शेतजमिनीची नोंद घेण्यात आली होती. ही दुरुस्ती होण्यासाठी तक्रारदाराने उत्तर सोलापूर तहसीलमध्ये अर्ज केला होता.
तक्रारदाराच्या अर्जाप्रमाणे ७/१२ उताऱ्यावर दुरुस्तीची नोंद करण्यासाठी लोकसेवक महसूल सहाय्यक रणसुभे यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली व सदरची रक़्कम स्वत: स्वीकारताना लाच लुुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदाराने लागलीच लाच लुचपत पथकाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करुन ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अन्वये गुन्हा नोंदला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे-खराडे, पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, हवालदार अतुल घाडगे, सलीम मुल्ला, स्वामीराव जाधव, राहूल गायकवाड यांनी केली.